नागपूर : संरक्षित वनामध्ये प्रवेशावर बंदी असली तरी राखीव वनातील प्रवेशावर मात्र कसलाही मज्जाव नाही. त्यामुळे हौशी पर्यटक अशा जंगलांमध्ये मुक्तपणे फिरतात. मात्र अशा भ्रमंतीवरही बंधन घालण्याचा विचार वनविभागाचा आहे. यामुळे वनात चालणाऱ्या पार्ट्या, मौजमस्तीवर लगाम घालण्यासोबतच वन्यजीवांची सुरक्षाही होणार आहे.
संरक्षित, तसेच अभयारण्य म्हणून घोषित केलेल्या वनामध्ये प्रवेशासंदर्भात कडक नियम आहेत. अशा वनांमध्ये परवानगीशिवाय प्रवेश करता येत नाही. पूर्वी अशा वनांमध्ये प्रवेशासाठी बंधन नव्हते. त्यामुळे हौशी पर्यटकांचा मुक्त संचार असायचा. त्यांच्यावर नियंत्रण राखणारी यंत्रणाही त्या काळात एवढी सक्षम नव्हती. मात्र आता वनाचे नियम बदलले. अनेक तरतुदी झाल्या. कायदे कडक झाले. यामुळे नंतरच्या काळात अशा वनांमधील प्रवेशावर बंधने आली. जंगलांमध्ये प्रवेश करताना नोंद होऊ लागल्याने वनविभागावरचा ताण बराच कमी झाला.
राखीव वनक्षेत्रात अद्याप असे कडक नियम लागू नाहीत. त्यामुळे हौशी पर्यंटक जंगलात मित्रपरिवारासह फिरतात, प्रसंगी पार्ट्याही होतात. काही ठिकाणी तर संस्थांच्या माध्यमातून ट्रॅकिंगसारखे कँपही वन परिसरात आयोजित होत असतात. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील किल्ले परिसरात असे प्रकार अधिक घडतात. यामुळे वन्यजीवांच्या अधिवासाला बाधा निर्माण होत असली तरी अशा जंगलातील प्रवेशावर बंधन नाही.
...
निर्माण होऊ शकते समस्या
विदर्भातील अनेक गावे वनव्याप्त आहेत. असा निर्णय झाल्यास चराईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेकांची शेती जंगलाला लागृून असल्याने याचाही विचार करावा लागणार आहे. आदिवासी गावांची उपजीविका वनांवर अवलंबून असते. यामुळे असा नियम करताना गावांची अडचण होणार नाही, वनहक्काचा भंग होणार नाही, याचाही विचार वनविभागाला करावा लागणार आहे.
...
वन्यजीवांचा वावर वाढला
अलीकडच्या काळात वाघ आणि बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक वाघ नव्या अधिवासाच्या शोधात फिरत असतात. राखीव वनांमध्येही अलीकडे वाघांचा वावर सुरू झाला आहे. मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी हे उत्तम पाऊल ठरणार आहे. विदर्भातील अनेक जंगलांमध्ये वाघांसह बिबट्यांची संख्या वाढली आहे. अनेकदा बिबटे गावालगतच्या झाडींमध्येही वास्तव्याला असतात, असे काही प्रसंगातून दिसून आले आहे. अशा बंधनांमुळे वनांमध्ये होणाऱ्या पार्ट्यांनाही आळा बसणार आहे.
...