लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : कामठी-खापरखेडा मार्गावरील वारेगाव बाह्यवळण मार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम शासनाने सुरू केले आहे. या बांधकामासाठी संबंधित कंत्राटदाराने हा रस्ता पूर्णत: बंद केल्यामुळे वारेगाव, सुरादेवी, बिना, काेराडी येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या बाह्यवळण मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदन साेपविले आहे.
वारेगाव बाह्यवळण मार्ग बंद झाल्याने खैरी गावातील पुलावरून वाहतूक सुरू आहे. या पुलावरून संरक्षक कठड्याविनाच वाहतूक सुरू असून, गावकऱ्यांना विनाकारण अंदाजे ५० किमीचा फेरा मारावा लागत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे खैरी गावातील पुलावरून संरक्षक कठड्याविना सुरू असलेली वाहतूक बंद करून वारेगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेश महासचिव सुरेश भाेयर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदन साेपविण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रा. अवंतिका लेकुरवाळे, पं.स. सदस्य दिशा चनकापुरे, वारेगावचे सरपंच बाल्या बांगरे, बिना येथील सरपंच हर्षवर्धन गजभिये आदी उपस्थित हाेते.