चुकीच्या प्रथा आजही कायम : महिला व बाल कल्याण विभागाची कारवाई नागपूर : आधीच्या काळात आपल्या मुलांना देवाच्या नावाने आश्रमाला, मंदिराला दान केले जायचे. परंतु पुढे बाल संरक्षण कायदा आला आणि अशा प्रकारांवर बऱ्यापैकी अंकुश ठेवण्यात यश मिळाले. पण, ही चुकीची प्रथा कायमची मात्र संपललेली नाही. अजूनही अशा काही घटना उघडकीस येतच आहेत. नागपूरसारख्या शहरात मठात दान दिलेली भावंडे आढळल्याने हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिला व बाल कल्याण विभागाच्या जिल्हा बाल संरक्षण कक्षाने वाडी परिसरातील देवलामेटी येथील एका मठातून देवाला अर्पण केलेल्या दोन भावंडांची सुटका केली आहे. वर्षभरापूर्वी सुद्धा नरेंद्रनगर परिसरातील एका आश्रमातून अशीच दोन मुले आढळली होती. याच मठात एका महिलेने परिस्थितीअभावी आपल्या मुलीला ठेवले होते. दीड वर्षानंतर ती महिला मुलीला घेऊन जाण्यासाठी मठात गेली असता मुलीला तिच्या सुपूर्द करण्यास मठातील लोकांनी नकार दिला. त्यामुळे या महिलाने जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे तक्रार केली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेसी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण व संरक्षण अधिकारी मिनल उईके यांनी पोलिसांच्या मदतीने मठाला भेट दिली. मठात महिलेची मुलगी त्यांना मिळाली नाही. परंतु दुसरी दोन भावंडे त्यांना आढळून आली. मठातील महिला साध्वीकडून त्या मुलांची विचारणा केली असता, ही मुले राजनांदगाव, छत्तीसगड येथील असून त्यांच्या वडिलांनी देवाला अर्पण केले असल्याचे सांगितले. बाल संरक्षण कायद्यांतर्गत मुलांना दान देणे हा गुन्हा असल्याने, बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी दोन्ही मुलांना मठातून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेला मुलगा ७ वर्षांचा आहे. तर मुलगी ११ वर्षांची आहे. (प्रतिनिधी)मुलांचे दान करणे गुन्हा या दोन्ही मुलांना त्यांच्या वडिलांनी अगदी लहान असताना, मठाच्या सुपूर्द केले होते. मुले तिथे शिकतही होती. परंतु मठाच्या साध्वीकडे चौकशी केली असता, त्यांनी ही मुले देवाला अर्पण करण्यासाठी दान दिल्याचे सांगितले. बाल संरक्षण कायद्यान्वये मुलांना दान देणे हा गुन्हा असल्याने ही कारवाई करण्यात आली असून, बाल कल्याण समितीपुढे मुलांना सादर करून समितीच्या निर्देशानुसार मुलांचे पुनर्वसन करण्यात येईल.- मुश्ताक पठाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी
देवाला अर्पण केलेल्या भावंडांची सुटका
By admin | Updated: January 13, 2017 01:57 IST