नागपूर : लोहमार्ग पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी मंगळवारी केलेल्या आकस्मिक पाहणी दौऱ्यात पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे कर्तव्यावर दारू पिऊन टुन्न असलेले आढळले. याची गंभीर दखल घेत, त्यांना नागपूर ठाण्यातून तत्काळ हटविण्यात आले. या निर्णयामुळे लोहमार्ग पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे गेल्या दोन वर्षांपासून नागपूर लोहमार्ग ठाण्यात ठाणेदार म्हणून कार्यरत आहेत. अतिशय व्यस्त आणि महत्त्वपूर्ण म्हणून नागपूर रेल्वे स्थानकाची गणना होते. नागपूर रेल्वे स्थानक आणि परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने, या ठिकाणी कर्तव्यदक्ष असणे गरजेचे आहे. मात्र, पोलीस निरीक्षक जगदाळे चक्क दारू पिऊन झोप काढताना आढळले. लॉकडाऊनच्या काळातही ते वादगस्त राहिले. एका टीसीला दारू पिऊन मारहाण केल्यावरून वादंग निर्माण झाला होता. वरिष्ठांच्या मध्यस्थीने हे प्रकरण शांत झाले होते.
जगदाळे यांच्या कार्यासंबंधी संपूर्ण माहिती पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांना मिळाली. राजकुमार यांनी सोमवार २६ जुलैला अचानक नागपूर ठाण्याचा दौरा केला. दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास ते नागपूर लोहमार्ग ठाण्यात पोहोचले असता, पोलीस निरीक्षक जगदाळे चक्क झोप काढताना आढळले. अधीक्षकांनी अधिक चौकशी केली असता, थकवा घालविण्यासाठी झोप घेतल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण चौकशी केल्यानंतर नागपूर ठाण्यातून त्यांना तडकाफडकी हटविले. त्यांच्या जागी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांना प्रभारी चार्ज देण्यात आला आहे, तर जगदाळे यांना नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले.
.........
काम न करणाऱ्यांना धडकी
पोलीस निरीक्षक जगदाळे यांना हटविल्यामुळे कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांवर कुठलाच फरक जाणवला नाही. मात्र, त्यांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना धडकी भरली आहे. त्यांच्या आशीर्वादाने काही कर्मचारी बिनधास्त होते.
........
झोप काढताना आढळले
पोलिस निरीक्षक सतीश जगदाळे कर्तव्यस्थळी झोप काढत होते. कारवाई म्हणून त्यांना ठाण्यातून हटवून नियंत्रण कक्षात अटॅच करण्यात आले आहे. नागपूर ठाण्याचा प्रभारी कारभार पोलीस निरीक्षक मनीषा काशीद यांना देण्यात आला आहे.
- एम. राजकुमार, लोहमार्ग पोलीस अधीक्षक
....
.....