जितेंद्र ढवळे
नागपूर : रुग्ण, शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मटणाचे सूप पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण या सूपमध्ये सोडिअम, पोटॅशिअम, कार्बोहायड्रेट, फायबर, प्रथिने, ‘अ’ जीवनसत्व, ‘क’ जीवनसत्त्व, कॅल्शिअम, लोह असे अनेक पोषक घटक असतात. मात्र, जनावरांच्या खुरापासून (विशेषत: म्हशीच्या) तेल काढून लाखो रुपये कमाविता येऊ शकतात.
महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या मुंबई येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाने ‘नीट् फुट ऑईल’ वर संशोधन केले आहे. मात्र, हे संशोधन केवळ कागदावरच राहिल्याने भारतात आजही हे तेल आयात करावे लागले. साधारणत: ५ ते ६ हजार रुपये प्रतिलिटर असा या तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारभाव आहे.
मृत गाई, बैल, म्हशीच्या खुरापासून ‘नीट् फुट ऑईल’ तयार केले जाऊ शकते. स्लॉटर हाऊसला हा व्यवसाय वाढीसाठी पर्याय ठरू शकतो. माफूसच्या मुंबई येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ विभागाने याबाबतचे संशोधन केले आहे. ‘नीट् फुट ऑईल’ ची भारतात कोणत्या उद्योगांना उपयोगी पडू शकते याबाबतचा अहवालही महाविद्यालयाने भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आयसीआर) आणि विद्यापीठाला दिला आहे.
‘नीट् फुट ऑईल’ म्हणजे काय?
‘नीट् फुट ऑईल’ जनावरांच्या खुरापासून तयार केले जाते. साधारणत: १ किलो खुरापासून १०० ते १२५ मि.ली. ऑईल तयार केले जाऊ शकते. ‘ऑटो क्लेव’ या उपकरणात एका विशिष्ट वातावरणात हे तेल तयार केले जावू शकते. यासंदर्भात पशुवैद्यकीय महाविद्यालयाने मॉडेलही विकसित केले आहे.
कुठे केला जावू शकतो उपयोग ?
‘नीट् फुट ऑईल’चा उपयोग कापड उद्योग (टेक्सटाईल इंडस्ट्री), एअरक्राफ्ट, सॅटेलाईटमधील उपकरणांत प्रभावशाली ल्युब्रिकंट म्हणून केला जाऊ शकतो. याशिवाय घड्याळ आणि लेदर उद्योगात या तेलाचा वापर करणे शक्य आहे. विशेष म्हणजे उने (मायनस) ४० ते ५० अंश तापमानातही हे तेल गोठत नाही.
मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ विभागाने याबाबतचे संशोधन केले आहे. ‘नीट् फुट ऑईल’ ही संकल्पना जुनी असली तरी हे तेल तयार करण्याचे अद्ययावत मॉडेल महाविद्यालयाने तयार केले आहे. भारतात आजही हे तेल आयात केले जाते. ते इथेच तयार झाल्यास यातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणे शक्य आहे.
- प्रा. रवींद्र झेंडे,
विभागप्रमुख, पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ विभाग
पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई