कोविड लसीकरण : केंद्रावरील गर्दी कमी करण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी धोकादायक आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी आज गुरुवारपासून प्रत्येक झोन कार्यालयातून ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ज्यांना स्वत: घरून लसीकरणासाठी नोंदणी करणे शक्य आहे. त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. ज्यांच्याकडे ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था नाही, अशांकरिता मनपातर्फे विशेष व्यवस्था केली जाणार आहे.
लसीकरण केंद्रांवर नोंदणी झालेल्यांना वेळेवर लस मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. लसीकरणासाठी ऑनलाईन सोबतच ऑफलाईन नोंदणीही सुरू आहे. मात्र ऑनलाईन नोंदणीला प्राधान्य देऊन ऑफलाईन पद्धतीने दररोज प्रत्येक केंद्रासाठी केवळ २५ लोंकांनाच परवानगी देण्यात यावी. यानंतर येणाऱ्या व्यक्तींना पुढील तारखेचे टोकन मिळणार आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजता व त्यानंतर दररोज १०.३० ते १२.३० या वेळेत ऑनलाईन नोंदणी काउंटर सुरू ठेवण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी बुधवारी दिले. लसीकरण केन्द्रांमध्ये गैरसोय होत असल्याने महापौरांनी आढावा घेतला. स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, झोनचे सभापती उपस्थित होते.
...
खासगी रुग्णालयात लसीकरण सुविधा
११ शासकीय कोविड लसीकरण केंद्रासह बुधवारी मनपाच्या केटीनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाला सुरुवात झाली. यासोबतच शहरातील नोंदणी झालेल्या खासगी लसीकरण केंद्रावर आज गुरुवारपासून लसीकरणाला सुरुवात होत आहे. नागपूर शहरातील रेडियन्स हॉस्पिटल, वर्धमाननगर, न्यू ईरा हॉस्पिटल, वर्धमाननगर, सीम्स हॉस्पिटल, कामठी रोड, अर्नेजा हॉस्पिटल, बारस्कर हॉस्पिटल, सुश्रुत हॉस्पिटल, रामदासपेठ, सेंटर पॉईंट हॉस्पिटल, मेडिकल चौक, क्युअरईट हॉस्पिटल, दिघोरी चौक, होप हॉस्पिटल, केशव हॉस्पिटल मानेवाडा, मेडिकेअर हॉस्पिटल मानकापूर चौक, कुणाल हॉस्पिटल छिंदवाडा रोड, आयकॉन हॉस्पिटल अमरावती रोड या रुग्णालयांमध्ये गुरुवारपासून लसीकरण घेता येणार आहे.