कामठी : महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये चढताना एका वृद्ध प्रवाशाचा तोल जाऊन तो गाडीखाली येत असल्याचे दिसताच तिथे उपस्थित असलेल्या रेल्वे गार्ड ईशांत दीक्षितने क्षणाचाही विलंब न करता धाव घेत वृद्धाला वर खेचत त्याचे प्राण वाचविले. गुरुवारी सकाळी ९.५५ वाजताच्या सुमारास कामठी रेल्वे स्थानकावर ही घटना घडली.
रेल्वे गार्ड वी.जे. जनवारे व ईशांत दीक्षित हे कामठी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर कर्तव्य बजावीत होते. त्यावेळी सकाळी ९.५३ वाजता महाराष्ट्र एक्स्प्रेस प्लॅटफार्म क्र.२ वर आली. तिथे उभे असलेले वृद्ध प्रवासी दुर्गा प्रसाद छोटेलाल सराफ (६८), रा. लालाओळी, कामठी हे त्यांचे साहित्य गाडीत चढवीत होते. तेवढ्यातच गाडी सुरू झाली. सराफ यांच्याजवळ साहित्य जास्त असल्याने ते वेळेत बोगीत ठेवू शकले नाही. अशात गाडी सुरू होताच तातडीने बोगीत चढताना त्यांचा पाय स्लीप झाला आणि रेल्वे ट्रॅकवर तोल गेला. ते गाडी खाली येत असल्याचे दिसताच तिथे उपस्थित ईशांत दीक्षित यांनी धाव घेत सराफ यांना तातडीने वर खेचले. सराफ हे शेगाव येथे जात होत. सराफ यांना सोडण्यासाठी आलेले त्यांचे मित्र सूर्यकांत शर्मा, रा. लालाओळी, कामठी हेही घटनेच्या वेळी प्लॅटफार्मवर उपस्थित होते. दीक्षित यांनी जिवाची पर्वा न करता सराफ यांचे प्राण वाचविल्याबद्दल रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी व शर्मा यांनी पुष्पगुच्छ देत साहसी कार्याबद्दल कौतुक केले.