लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोकणातून विरोध होत असल्याने नाणार ‘पेट्रोकेमिकल रिफायनरी’ प्रकल्प विदर्भात आणण्याची मागणी समोर येत आहे. या प्रकल्पामुळे विदर्भाचा आर्थिक विकास तर होईलच. शिवाय येथे नवीन प्रक्रिया उद्योगदेखील येतील व पर्यायाने रोजगारात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. भौगोलिक स्थान, पायाभूत सुविधा, ‘कनेक्टिव्हिटी’, जमिनीची कमी किंमत, ‘लॉजिस्टिक्स’ या जमेच्या बाजू लक्षात घेता या ‘रिफायनरी’साठी विदर्भ हेच योग्य स्थान आहे, असा दावा काही तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
विदर्भातील अनेक बलस्थानांकडे राज्य शासनाने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. सध्याच्या औद्योगिक स्थितीत ‘रिफायनरी’ व ‘पेट्रोकेमिकल्स’चे महत्त्व वाढलेले आहे. केवळ वेगवेगळ्या प्रकारचे इंधनच नव्हे तर उद्योगांसाठी आवश्यक असलेले घटकदेखील त्यातून मिळतात. गुजरातमध्ये ४५ टक्के रिफायनिंग व ८० टक्के पेट्रोकेमिकल्सचे उत्पादन होते व तेथे टेक्सटाईल, सिरॅमिक्स, फार्मसी, एफएमसीजी आणि खतांच्या उद्योगात प्रचंड गुंतवणूक येत आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ‘रिफायनरी’तील उत्पादनांचाच उपयोग केला जात आहे. विदर्भात ‘रिफायनरी’ आल्यावर ‘इंडस्ट्रीअल प्लास्टिक’, ‘लुब्रिकन्ट्स’, टायर्सचे नवीन प्रकल्प येतील. याशिवाय आपल्याकडे जमीन-पाणी व विजेची उपलब्धता, सुशिक्षित तरुणांचे मनुष्यबळ या बाब लक्षात घेता ‘रिफायनरी’ स्थापन करण्यासाठी विदर्भ हे उत्तम स्थान आहे, असे मत या विषयातील तज्ज्ञ प्रदीप माहेश्वरी यांनी व्यक्त केले.
प्रक्रिया उद्योगांत वाढ होईल
‘रिफायनरी’मुळे सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग येतील व तेथे कृषी उत्पादनांचा कच्चा माल म्हणून उपयोग होईल. यातून कच्च्या मालाची मागणी वाढेल व त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल. विदर्भात कापसाचे उत्पादन जास्त होते. त्यामुळे विविध प्रकारचे ‘टेक्सटाईल’ बनविण्यास वाव राहील. सोबतच विविध प्रक्रिया उद्योगदेखील उभे राहतील.
शेतकऱ्यांसाठी नवीन पिकांचा पर्याय
‘रिफायनरी’मुळे विदर्भात ‘लुब्रिकन्ट्स युनिट’ येतील व त्यासाठी एरंडेल तेलाची मागणी वाढेल. येतील शेतकरी त्याचे उत्पादन घेऊ शकतील. शिवाय ‘रिफायनरी’मुळे ‘इथेनॉल’ची विक्री आणखी वाढेल. कन्हान, पैनगंगा व वैनगंगा या नद्यांच्या जवळपास शेतकरी ऊसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकतात व त्यामुळे उद्योजकता वाढेल.
कापसाची मागणी वाढेल
‘रिफायनरी’ व कापूस प्रक्रिया उद्योग यशस्वी होऊ शकतो हे गुजरातने दाखवून दिले आहे. सुरतप्रमाणे विदर्भातदेखील विविध प्रकारचे सूत बनविण्यासाठी ‘टेक्सटाईल युनिट्स’ सुरू होतील. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील व विदर्भाची अर्थव्यवस्था प्रगती करेल.
रोजगारनिर्मिती होईल
‘रिफायनरी’चा मोठा प्रकल्प आल्यानंतर तेथे काम करणाऱ्या मनुष्यबळाची वाढ होईल. त्यामुळे मेट्रो, उड्डाणपूल वापरणाऱ्यांची संख्या वाढेल. त्यादृष्टीने पायाभूत सुविधांचा आणखी विकास करण्यास संधी निर्माण होईल. या क्षेत्रात ३ लाख थेट रोजगारांची निर्मिती होऊ शकेल.