‘श्री’चे गर्भगृह सुरक्षित ठेवण्यासाठी उभारत आहे आठ पिलर : मंदिराचे पूर्व द्वार आवागमनासाठी बंदनागपूर : गणेश टेकडी मंदिराच्या पुनर्बांधणीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. नियोजनासाठी मंदिर समितीचे बैठकांचे सत्र सुरू आहे. मंदिराचे गर्भगृह सुरक्षित राहावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून लोखंडाचे आठ पिलर उभारण्याचे काम सुरू आहे. मंदिर बांधकामासाठी लागणारे लोखंड मंदिर परिसरात पोहचले आहे. त्यामुळे मंदिराच्या पूर्वेकडील दोन प्रवेशद्वारांपैकी एक द्वार बंद करण्यात आले आहे. मंदिर समितीतर्फे येत्या १० दिवसात मंदिर पुनर्बांधणीच्या कामासाठी कंत्राटदाराचे नाव निश्चित केले जाणार आहे. भक्तांना दर्शनासाठी येता यावे म्हणून पार्किंगचे द्वार सुरू ठेवण्यात आले आहे. मंदिर बांधकाम सुरू असतानाही भक्तांना दर्शनासाठी कुठलाही अडथळा येऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे. सद्यस्थितीत असलेले उदबत्ती व धूपबत्ती स्टॅण्ड मंदिराच्या समोरील प्रांगणात स्थानांतरित करण्यात आले आहे. उन्हापासून बचावासाठी संपूर्ण मंदिर परिसरात ग्रीन नेटचा मंडप टाकण्यात आला आहे. मंदिरात भक्तांना भोजन बनविण्यासाठी देण्यात येणारे सहा ओटे स्थानांतरित करण्याचा आराखडा तयार केला जात आहे. सोबतच जोडे चप्पल स्टॅण्ड, दुचाकी व चारचाकी पार्किंग स्टॅण्ड आदी सुविधांबाबतही विचार केला जात आहे. श्रीगणेश टेकडी येथील दी अॅडव्हायजरी सोसायटी आॅफ गणेश मंदिर, टेकडी, सीताबर्डीचे सचिव श्रीराम कुलकर्णी यांनी सांगितले की, नुकतेच मंदिरातर्फे वार्षिक कार्यक्रमाची श्रीगणेशाच्या श्रीविग्रहासह मंदिराच्या नव्या प्रतिकृतीसह प्रकाशित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) नव्या मंदिराची प्रतिकृती तयारनव्या मंदिराच्या प्रतिकृतीचे तैलचित्र मंदिर समितीने तयार केले आहे. दगडांवर कोरीव काम करण्यासाठी भरपूर कारागीर बोलाविले जातील. दोन महिन्यात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. सचिव श्रीराम कुलकर्णी यांनी सांगितले की, मंदिरात काही सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. आणखी जमीन मिळण्याची शक्यता सद्यस्थितीत मंदिराजवळ ०.६७ एकर जमीन आहे. भविष्यात मंदिराला संरक्षण विभागाकडून एक एकर जमीन मिळण्याची शक्यता आहे. या जमिनीवर सुभाष चौकाकडून नवा प्रस्तावित मार्ग व पार्किंगची व्यवस्था केली जाईल.
टेकडी गणेश मंदिराची पुनर्बांधणी लवकरच
By admin | Updated: April 4, 2017 02:17 IST