वाचन व्यासंगी आंबेडकर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 09:49 AM2020-12-06T09:49:25+5:302020-12-06T10:12:57+5:30

Nagpur News Dr Babasaheb Ambedkar डॉ. आंबेडकराना प्रचंड वाचन वेड होतं. ते जगातील सर्वश्रेष्ठ वाचकांपैकी एक होते.

Reading enthusiast Ambedkar! | वाचन व्यासंगी आंबेडकर!

वाचन व्यासंगी आंबेडकर!

googlenewsNext


आमीन गुलमहंमद चौहान
नागपूर:

स्वकष्टाने, स्वत:च्या बुध्दिमत्तेने व कर्तृत्वाने संपादन केलेली प्रचंड शक्ती म्हणजे डॉ. आंबेडकर होय. अस्पृश्यांच्या अनन्वित छळातून बाहेर पडलेला तो ज्वालामुखी होता. आपल्या एका आयुष्यात एवढी किमया करणारी, सर्वसामान्य लोकांमधील स्वाभिमान जागा करून त्यांना लढ्यासाठी उद्युक्त करणारी व्यक्ती असंही आंबेडकरांना म्हणता यईल. विद्वत्तेने, कर्तृत्वाने, कीर्तीने त्यांनी भारतातील सर्व पुढाऱ्यांना मागे टाकले! सर्वव्यापी कार्य असणारे, डॉ आंबेडकर बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी होते. त्यांच्या ग्रंथप्रेम आणि वाचन व्यासंगाविषयी जाणून घेऊया.

डॉ. आंबेडकराना प्रचंड वाचन वेड होतं. ते जगातील सर्वश्रेष्ठ वाचकांपैकी एक होते. इंग्लडमध्ये शिकत असताना तेथील ब्रिटिश म्युझियममध्ये वाचण्यासाठी ते जात असत. या ठिकाणी घडलेला सँडविचचा किस्सा सर्वपरिचित आहेच. तिथे दुपारी काहीही न खाता ते 12 तास वाचन करीत. केवढा तरी कष्टाळू व निश्चयी स्वभाव! ज्ञानाची भूक शमविण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी अशाप्रकारे पोटाची भूक मारून टाकली.

भीमरावांमध्ये हा वाचन व्यासंग निर्माण करून तो टिकविण्याचा पुरेपूर प्रयत्न वडिल रामजी सकपाळ यांनी केला. घरची परिस्थिती अतिशय विदारक आणि दयनीय असतांना आंबेडकरांनी मागीतलेलं प्रत्येक पुस्तक पुरविण्याचं कार्य रामजींनी केलं. आंबेडकरांनी मागितलेलं पुस्तक त्यांना मिळालं नाही असं कधीच झालं नाही. त्यांच्या मुंबईत राहत असलेल्या बहिणींनी त्यांना पुस्तके विकत घेण्यासाठी अनेकवेळा मदत केली. प्रसंगी त्यांना भावाच्या वाचन व्यासंगापायी आपले दागिने गहाण ठेवण्यासाठी आपल्या वडिलांकडे सुपुर्द केले. रामजींकडे ज्यावेळी बाबासाहेबांनी मागितलेल्या पुस्तकासाठी पैसे नसायचे त्यावेळी ते तडक आपल्या मुलीच्या घरी जायचे. त्यावेळी आंबेडकरांच्या दोन बहिणी मुंबईत राहत असत. एका मुलीकडे पैसे मिळाले नाही तर त्यांना दुसऱ्या मुलीकडे जावे लागे. तिच्याकडेही पैसे नसेल तर तर ते मुलीला एखादा दागिना मागत. बहिणही कोणतेही आढेवेढे न घेता आपला दागिना भावाच्या पुस्तकासाठी वडिंलांकडे सुपूर्द करायची. रामजी मग हा दागिना मारवाड्याकडे गहाण ठेवत आणि त्या पैश्यातून बाबासाहेबांनी मागितेलं पुस्तक घरी येत असे. पुढे पैसे आल्यावर रामजी हा दागिना सोडवून बहिणीचा बहिणीला परत करीत.

भीमराव दहावीत पहिला आला म्हणून त्याच्या केळुस्कर नावाच्या गुरुजींनी त्याला गौतम बुध्दांचे चरित्र भेट दिले होते. त्याकाळी मुंबईत असणारे भीमराव चरणी रोडवरील बागेत जाऊन पुस्तके वाचत असत. केळुस्कर गुरुजी संध्याकाळी तिथे फेरफटका मारण्यासाठी येत. त्यांना वाचनात गुंग असणारा भीमराव पाहून विलक्षण कौतुक वाटे. असा हा वाचन व्यासंग डॉ आंबेडकर यांनी पुढे आयुष्यभर जोपासला. वेळोवेळी ते अभ्यास करून लिखाण, भाषणं आणि सभांना सामोरे जात असत.

दादरच्या हिंदू कॉलनीत राजगृह हे दुमजली घर बाबासाहेबानी बांधून घेतले होते. पुस्तकांसाठी बांधलेलं हे त्याकाळातील पहिलं घर असावं. मात्र आपल्या वाचन व्यासंगापायी त्यांना आपले चारमिनार नावाचे घर विकावे सुध्दा लागले होते याविषयी फार कमी लोकांना माहिती असेल. त्याचे झाले असे की, भारताला अधिक राजकीय अधिकार देण्याच्या संदर्भात विचारविमर्श करण्यासाठी एक आयोग नियुक्त करण्याची घोषणा इंग्लडचे प्रधानमंत्री स्टेनले बाल्डविन यांनी केली. या सात सदस्यांच्या समितीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सदस्य म्हणून ५ ऑगस्ट १९२८ ला मुंबई विधिमंडळातून निवड झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अर्थशास्त्र आणि कायदा या विषयांचा सखोल व सूक्ष्म अभ्यास होता. त्यांनी राजकारणावरील काही पुस्तके वाचली होती. डॉ.बाबासाहेबांना जाणीव झाली की, आता भारतीय राजकारणात संविधानाचा विषय फार मोठ्या प्रमाणात चर्चेत येईल. अशा वेळी मौन राहणे, अत्यंत धोक्याचे आहे. बाबासाहेबांनी ६ आणि ७ ऑगस्टला आपल्या काही मित्रांकडून ४०० रुपये उधार घेतले. ८ ऑगस्टला तारापूरवाला बुकसेलर्सच्या दुकानातून ८५० रूपयांची संविधानाशी संबंधित पुस्तके विकत घेतली. अर्थात उरलेले 450 रु उधार ठेवून! ९ ऑगस्टपासून सकाळी आपल्या कार्यालयाच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सतत दोन आठवडे या 15-20 ग्रंथांचा अभ्यास केला. संविधानाच्या अभ्यासाची सुरुवात त्यांनी अशाप्रकारे केली. तारापूरवाला बुकसेलर्सकडून नंतरदेखील नवीन पुस्तके खरेदी केली. पुढे या दुकानाची पुस्तके खरेदीची उधारी इतकी झाली की, त्यांना उधारीचे पैसे परत करण्यासाठी १९३६ मध्ये 'चारमिनार' हे घर अक्षरश: विकावे लागले.

राजगृह या घरात खालच्या मजल्यावर माणसे राहायची अन वरचा संपूर्ण मजला पुस्तकांसाठी राखीव होता. आचार्य अत्रे राजगृह या घराविषयी त्यांच्या नियतकालिकात लिहतात, आंबेडकर घरात नव्हे तर ग्रंथालयात राहतात. पुस्तकांच्या गराड्यात राहणारा डॉ. आंबेडकरांसारखा पुस्तक वेडामाणूस हिंदुस्थानात शोधून सापडणार नाही!
भारतात सध्या सर्वात जास्त पुतळे डॉ. आंबेडकरांचे आहेत. मात्र स्मारकं ही ग्रंथालयेचं असावी असं ठाम मत बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. फिरोज शहा मेहता यांचे स्मारक पुतळा उभारुन मुंबईत केलं जात असल्याचं अमेरिकेत असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांना कळालं. तेव्हा त्यांनी थेट लिव्हिंगस्टन हॉल, कोलंबिया विदयापिठ, अमेरिका येथून पत्र लिहून सार्वजनिक ग्रंथालय उभारुनच मेहतांचं स्मारक करावं असं सुचविलं होतं. 27 मार्च 1916 ला त्यांनी बॉम्बे क्रॉनिकल या वृत्तपत्रास ते पत्र लिहलं होतं. समाजास बौध्दिक आणि सामाजिक उन्नती करीता ग्रंथालयांची अपरिहार्य आवश्यकता या पत्रातून त्यांनी मांडली होती. अमेरिकेत असतांना त्यांनी ग्रंथांचं प्रचंड वाचन केलं. या वाचनातून जो थोडा वेळ त्यांना मिळायचा त्या वेळात ते रस्त्यांवरुन फिरुन ग्रंथ गोळा करायचे. अशी सुमारे 2000 ग्रंथ त्यांनी अमेरिकेतून विकत आणले होते.
आंबेडकरांचा हा वाचन व्य्यासंग आणि ग्रंथप्रेम आपणही या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपल्या घरी जपावं असं मला वाटतं. आंबेडकरांची जयंती, पुण्यतिथी नाचून साजरी केल्यापेक्षा वाचून साजरी करण्याची आज जास्त गरज आहे.

Web Title: Reading enthusiast Ambedkar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.