दोघांविरुद्ध गुन्हा : कोराडी पोलिसांची कारवाई नागपूर : तीन वर्षांपूर्वी विकलेल्या भूखंडाची दुसऱ्या व्यक्तीला पुन्हा विक्री करणाऱ्या दोघांवर कोराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. निसार खान मजनी खान (रा. जयहिंदनगर, मानकापूर) आणि अब्दुल जावेद आदानी (रा. तकिया, मोमिनपुरा) अशी या आरोपींची नावे आहेत. राजीव रामलाल चौधरी (वय ५५, रा. छावणी, सदर) यांनी आरोपीकडून २ सप्टेंबर २०१४ ला कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संत ज्ञानेश्वर सोसायटीत (झिंगाबाई टाकळी) पहन ११, खसरा क्रमांक ११२,११३,११४ मधील ८१ क्रमांकाचा भूखंड विकत घेतला होता. त्याची किंमत २६ लाख रुपये आहे. आरोपी निसार याने जावेदसोबत संगनमत करून या भूखंडाची विक्री करण्यासंबंधी हालचाली सुरू केल्या. वृत्तपत्रातून नोटीस वाचल्यानंतर चौधरी यांच्या लक्षात हा प्रकार आला. आरोपीने दुसऱ्यांदा एकाच भूखंडाची विक्री करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे चौधरी यांनी कोराडी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी शुक्रवारी फसवणुकीच्या आरोपाखाली निसार खान आणि अब्दुल जावेदविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींनी अशाच प्रकारे आणखी कुणाची फसवणूक केली काय, त्याचाही पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)
विकलेल्या भूखंडाची पुन्हा विक्री
By admin | Updated: April 1, 2017 02:55 IST