बरेच इच्छुक प्रदेशच्या यादीत : लवकरच घोषणानागपूर : प्रदेश काँग्रेसची नुकतीच जाहीर झालेली कार्यकारिणी पाहता लवकरच नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बदलले जातील, याचे संकेत मिळाले आहेत. काही इच्छुकांची प्रदेशस्तरावर वर्णी लागल्यामुळे आता स्पर्धा तशी कमी झाली आहे.माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांचा कल माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक किंवा युवक काँग्रेसच्या रामटेक लोकसभेच्या माजी अध्यक्ष कुंदा राऊत यांच्याकडे राहू शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे यांना या पदावर १० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी पक्षाकडे राजीनामा पाठविला होता, मात्र तो स्वीकारल्या गेला नाही.सहा महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी नवा जिल्हाध्यक्ष नेमण्याचे स्पष्ट संकेत दिले, मात्र निर्णय अद्याप झालेला नाही. प्रारंभी जिल्हाध्यक्ष पदासाठी प्रदेश पदाधिकारी हुकूमचंद आमधरे, जिल्हा सरचिटणीस प्रकाश वसू यांच्या नावावरही चर्चा झाली. मात्र, राष्ट्रवादीने माजी मंत्री अनिल देशमुख व रमेश बंग यांच्याकडे शहर व ग्रामीणची जबाबदारी सोपविल्यामुळे जिल्हा काँग्रेसची सूत्रेही दिग्गज नेत्यांच्या हाती सोपवावी, असा विचार समोर आला. वंजारी गटासह ज्येष्ठ नगरसेवकही नाराजप्रत्यक्ष मैदानात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रदेशच्या यादीत स्थान देण्यात आल्याचे दिसत असले तरी नेत्यांसमोर फाईल घेऊन फिरणाऱ्या, पुढे पुढे करणाऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे, असा आरोप यादीवर नाराज असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. पूर्व नागपुरातून विधानसभा लढलेले अभिजित वंजारी यांनी विधानसभेवरील मोर्चा व सोनिया गांधी यांच्या सभेसाठी परिश्रम घेतले. मात्र, त्यानंतरही त्यांचा नंबर लागला नाही. यावर वंजारी यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय दीपक कापसे, संदीप सहारे, प्रशांत धवड, संजय महाकाळकर, सुजाता कोंबाडे हे तब्बल तीनवेळा निवडून आले आहेत. मोर्चासाठी माणसं आणायची की नगरसेवक, आंदोलने करायची तर नगरसेवक, पक्षाच्या बैठकांची व्यवस्था करायची तर नगरसेवक; पण प्रदेश कार्यकारिणीत मात्र ज्येष्ठ नगरसेवकांना स्थान नाही, अशी नाराजी नगरसेवकांमध्ये व्यक्त केली जात आहे. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या शिस्तीमुळे कुणी उघडपणे नाराजी व्यक्त करण्यास तयार नाही.
काँग्रेस जिल्हाध्यक्षासाठी मुळक-राऊत स्पर्धेत
By admin | Updated: April 20, 2016 03:10 IST