नागपूर : एक १८ वर्षीय तरुणी हृदयाच्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त होती. या तरुणीच्या हृदयात चार नव्हे पाच कप्पे होते. यातच हृदयाला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनीही असामान्य होती. यामुळे चौथ्या कप्प्यातील पडद्यावर शस्त्रक्रिया करणे अवघड झाले होते. प्रसिद्ध हृदय शल्यचिकित्सक डॉ. आनंद संचेती यांनी हृदयाच्या खालच्याबाजूने शस्त्रक्रिया केली. अत्यंत गुंतागुतीची ही शस्त्रक्रिया तब्बल तीन तास चालली. अखेर डॉ. संचेती यांना यश मिळाले आणि तरुणीला जीवनदान. दुर्मिळातील दुर्मिळ असलेली ही शस्त्रक्रिया देशभरातील पहिलीच असल्याचा दावा डॉ. संचेती यांनी शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेत केला. डॉ. संचेती म्हणाले, ही तरुणी ‘डबल चेंबर राईट वेंट्रिकल’ आजाराने (डीसीआरव्ही) ग्रस्त होती. सामान्यत: हृदयात चार कप्पे असतात. परंतु या तरुणीच्या हृदयाला चौथ्या कप्प्यात जन्मत: पडदा असल्याने पाचवा कप्पा तयार झाला होता. परिणामी फुफ्फुसाला रक्तपुरवठा फार कमी होत होता. दुसरे म्हणजे, हृदयाला दोन वाहिन्यांमधून रक्तपुरवठा होतो. यातील एक डाव्या तर दुसरी उजव्या बाजूला असते. परंतु या तरुणीची डाव्या भागातील रक्तवाहिनी उजव्या भागात होती. यातच जन्मत:च उजव्या जवनिकेत रक्ताचा दाब वाढत गेल्यामुळे ही जनविका फार जाड झाली होती. यामुळे थोडे तरी चालले तरी तिला दम लागण्यासह इतर त्रास सुरू झाला होता. संभाव्य धोके लक्षात घेऊन हृदयावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते आणि तेवढचे आव्हानात्मकही होते. शस्त्रक्रियेला सुरुवात झाली तेव्हा डाव्या भागातील जवनिका उजव्या भागातील जवनिकेशी जुळली असल्याचे व ती जाड झाल्याचे आढळून आले होते. कोणत्याही पुस्तकात हृदयातील अशा परिस्थितीबाबत वाचण्यात न आल्याने अनुभव आणि ज्ञानाच्या आधारावर हृदयाच्या खालच्या भागातून शस्त्रक्रिया केली. यात चौथ्या कप्प्यातील पडदा काढून सामान्य केले, शिवाय रक्तवाहिनीची जाडीही कमी केली. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया राजीव गांधी जीवनदायी योजनेतून वर्धा येथील दत्ता मेघे इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स येथे झाले. या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयाचे संचालकांचे आणि विभागतील डॉक्टरांचे सहकार्य मिळाल्याचेही डॉ. संचेती म्हणाले. (प्रतिनिधी)
हृदयावर दुर्मिळ शस्त्रक्रिया
By admin | Updated: August 30, 2014 02:47 IST