दोन वर्षांपासून शोषण : आरोपी गजाआड, राजकीय वर्तुळात खळबळ नागपूर : भारतीय जनता युवा मोर्चाचा महामंत्री सूरज लोलगे ( वय ३२) याच्याविरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्याला पोलिसांनी अटकही केली. आज सायंकाळी झालेल्या या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली असून, घटनाक्रम जाणून घेण्यासाठी अनेकांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात धाव घेतल्यामुळे तेथे मध्यरात्रीपर्यंत मोठी गर्दी होती. भाजयुमोचा वादग्रस्त पदाधिकारी म्हणून सूरज लोलगे ओळखला जातो. त्याच्याविरुद्ध यापूर्वी चोरीचे सोने घेणे, मारपीट करणे आणि अशाच प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तो भामटी-परसोडी भागात राहतो आणि प्रतापनगरात त्याचे ज्वेलर्स आहे. याच भागात राहणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीसोबत त्याचे दोन वर्षांपूर्वी प्रेमसंबंध जुळले होते. लग्नाचे आमिष दाखवून तो तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंधही प्रस्थापित करायचा. लोलगे तिला पत्नीसारखा मान देण्याची बतावणी करीत असल्यामुळे तरुणी त्याचा विरोध करीत नव्हती. चार दिवसांपूर्वी त्याने दुसऱ्याच एका तरुणीसोबत साक्षगंध झाल्याची माहिती पीडित तरुणीला मिळाली. त्यामुळे तिने त्याला जाब विचारला. यावेळी सूरजने तिच्याशी अत्यंत आक्षेपार्ह वर्तन करून तिला धमकी दिली. आजही असेच झाले. त्यामुळे तरुणी आज दुपारी प्रतापनगर ठाण्यात पोहोचली. तिने लोलगेविरुद्ध बलात्कार आणि धमकी दिल्याची तक्रार केली. प्रकरण राजकीय पदाधिकाऱ्याच्या विरोधात असल्याने पोलिसांनी दिवसभर चौकशीचे गुऱ्हाळ चालवले. सायंकाळी या प्रकरणाचा बोभाटा झाल्यामुळे पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी करून बलात्काराचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)सूरज गजाआडलगेच पोलिसांनी सूरजला ताब्यात घेतले. आपण बड्या पक्षाचे पदाधिकारी असून, अनेक नेते आपल्या मागे असल्याचे सांगून त्याने पोलिसांवर दडपण आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, पोलीस आयुक्त, सहआयुक्तांकडून त्याच्या दडपणाला भीक न घालता कायदेशीर कारवाईचे आदेश मिळाल्याने प्रतापनगर पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली त्याला अटक केली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली. मध्यरात्रीपर्यंत या प्रकरणात काय होते, हे जाणून घेण्यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारात भरपावसात बघ्यांची गर्दी होती. '
भाजप पदाधिकाऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
By admin | Updated: July 15, 2014 01:06 IST