घडताहेत गावोगावच्या रणरागिणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:11 AM2021-01-19T04:11:10+5:302021-01-19T04:11:10+5:30

‘दुनिया के इस कठीण मंच पर एक प्रदर्शन मैं दिखलाऊंगी, कठपुतली नही किसी खेल की अब स्वतंत्र मंचन कर ...

Ranaraginis of villages are happening! | घडताहेत गावोगावच्या रणरागिणी !

घडताहेत गावोगावच्या रणरागिणी !

Next

‘दुनिया के इस कठीण मंच पर

एक प्रदर्शन मैं दिखलाऊंगी,

कठपुतली नही किसी खेल की

अब स्वतंत्र मंचन कर पंचम लहराऊंगी’

या काव्याला साजेशी प्रतिभा आता विदर्भातील गावागावात साकारताना दिसत आहे. सकाळ-सायंकाळच्या प्रहरी गावच्या वाटेवर मुलांच्या बरोबरीने कवायती करणाऱ्या, कमरेला ओढणी खोचून गावच्या कच्च्या रस्त्यावर धावणाऱ्या, पुस्तकात रमून स्पर्धा परीक्षेचे शिखर गाठू पाहणाऱ्या या मुलींची ही कसली तयारी चाललीय? ही तयारी आहे एका बदलाची ! ही तयारी आहे महिलेच्या नव्या रूपाची आणि नारी सक्षमतेची ! पूर्वेच्या क्षितिजावर उगवू पाहणारी ही सूर्योदयापूर्वीची लाली सांगतेय, होय, आम्हीही पोलिसात जाणार; सैन्यात जाणार; जुनी प्रतिमा मोडीत काढून नवी कणखर प्रतिमा झळकवणार !

सध्या अनेक ठिकाणी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुरू आहे. पूर्वी पोलीस भरती म्हटले की तरुणांचीच झुंबड उडायची. मुलींची रांग त्या तुलनेत लहान असायची; पण गेल्या काही वर्षांत काळ बदलला. महिला सक्षमीकरणाचा वारू चौखूर उधळत थेट गावखेड्यापर्यंत पोहोचला. कधी काळी पुरुषी मक्तेदारी असलेल्या नोकऱ्या आता महिलाही तेवढ्याच सक्षमपणे गाजवायला निघाल्या. हा बदल आता दूरवर पोहोचलाय. सध्या सुरू असलेल्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणात असलेला मुलींचा सहभागही हेच सांगत आहे. गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर हे नक्षलग्रस्त जिल्हे. आर.आर. पाटील गृहमंत्री असताना पोलीस भरतीमध्ये पाठबळ मिळाले. या प्रक्रियेतील प्रश्नपत्रिकेत गोंडी भाषेवर आधारित २५ टक्के गुणांच्या प्रश्नांचा सहभाग केला. कसेबसे शिक्षण पूर्ण करून नोकरीची स्वप्ने पाहणाऱ्या आदिवासी युवक-युवतींसाठी ही पर्वणी ठरली. शेकडोंनी युवक पुढे आले. यात युवतीही आता मागे नाहीत. पोलीस विभागाकडून चालविल्या जाणाऱ्या भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरांमध्ये मुलींचा टक्का वाढला. मुलींमध्ये असलेली ही चढाओढ आजही कायम दिसते. गडचिरोलीत एका खाजगी संस्थेकडून होणाऱ्या ३०० युवकांच्या प्रशिक्षणात आज १६० युवतींचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यात तर पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी सर्व ठाणेदारांना स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरे घेण्याचा सल्ला दिला आहे. गोबरवाहीचे ठाणेदार दीपक पाटील यासाठी आधीपासूनच धडपडत आहेत. त्यांच्या शिबिरात १५० मध्ये ५० मुली आहेत. पालांदूरमध्ये १२० मध्ये ७० मुली आहेत. लाखांदुरातही असेच चित्र आहे. गोंदियामध्येही पोलीस विभाग यासाठी आग्रही आहे. देवरी, आमगाव, केशोरी या ठिकाणी होणाऱ्या प्रशिक्षणात मुलांएवढीच मुलींचीही गर्दी असते. स्थानिकांना मिळालेली ही संधी येथील तरुणींसाठीही पर्वणीच आहे.

चंद्रपुरातील जिल्हा स्टेडियम आजही कोरोनावर मात करून सकाळ-सायंकाळ तरुणाईने गजबजलेले असते. भरती प्रक्रियेपूर्वी येथेही पोलीस विभागाकडून प्रशिक्षण शिबिर होत असते. सामाजिक संघटना आणि संस्थाही या कामी पुढे असतात. यवतमाळ शहरातील तरुणीही यात मागे नाहीत. तिथे सध्या चार शिबिरे सुरू आहेत. त्यात १६० युवती स्वत:ला घडवीत आहेत. यवतमाळच्या ग्रामीण भागात मात्र ही उणीव आहे. त्यामुळे शहरात येऊन या मुली प्रशिक्षणातून स्वत:ला घडवीत आहेत. वर्धा शहरात असे प्रशिक्षण केंद्र सुरू नसले तरी पोलीस भरतीमध्ये पुढे राहण्यासाठी मुलींची धडपड सुरू असलेली मैदानावर दिसते. अमरावती तर बलोपासनेत कायम पुढेच असते. तेथील स्टेडियम, खेळाची मैदाने, व्यायामाची परंपरा व त्यासाठी होणारा आग्रह यातूनही तरुणी घडत आहेत. विविध प्रशिक्षणातून किंवा स्वबळावर त्यांची चाललेली धडपड सहज दृष्टीस पडावी, अशी आहे.

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या निमित्ताने घडत चाललेला हा बदल नक्कीच आशादायक आहे. नाकासमोर चालणाऱ्या, आयुष्यातील संधीचा फारसा विचार न करता ‘ठेविले अनंते’ या न्यायाने चाकोरीत जगणाऱ्या कालच्या महिलांची ही नव्या युगातील सक्षम आवृत्ती आहे. एका सक्षम समाजनिर्मितीच्या दिशेने सुरू असलेला हा प्रवास गावखेड्यातील काळोखातले कोपरे उद्या लख्ख करतील, यात शंका नाही.

Web Title: Ranaraginis of villages are happening!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.