आराखडा सचिव समितीकडे सादर करा : पालकमंत्री बावनकुळे यांचे निर्देशनागपूर : रामटेकचा पर्यटन विकास आराखडा तयार झाला असून आधुनिक पद्धतीने विकास करण्याच्या दृष्टीने यात काही सुधारणा करण्यात येणार असून विभागीय आयुक्तांमार्फत तो शासनाच्या सचिव समितीकडे सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. २०० कोटींचा हा पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.शुक्रवारी रविभवन येथे आयोजित बैठकीत या विकास आराखड्याचा आढावा घेण्यात आला. याप्रसंगी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी उपस्थित होते. या आराखड्यात सुधारणा आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी दोन सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे. या विकास आराखड्यात कालिदास स्मारकाचा विकास, सिमेंट रोड, सांडपाण्याच्या नाल्या, पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या, शौचालये, विद्युतवाहन, पर्यटकांसाठी पुरेसे पार्किंग, म्युझिकल फाऊंटेन, वराह मंदिरात रॉक गार्डन आदींचा समावेश आहे. रॉक गार्डनमध्ये रामायणातील विविध घटनांचे देखावे चित्रांच्या रूपात साकारले जाणार आहेत. प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी सोलर पॅनेलवर विद्युत दिवे व अन्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.तसेच खिंडसी तलाव पार्किंग क्षेत्राचा विकास, अंबाळा तलावाचे सौंदर्यीकरण, अस्थी विसर्जनासाठी स्वतंत्र व्यवस्था, नारायण टेकडीचे सौंदर्यीकरण, राखी तलावाचे सौंदर्यीकरण, बालकांसाठी बालोद्यान विकास या कामांचाही पर्यटन विकास आराखडयात समावेश आहे.रामटेकच्या पर्यटन विकास आराखड्यासाठी उच्च दर्जाचा आर्किटेक्ट नेमून आधुनिक पद्धतीने विकास करण्यासाठी अतिरिक्त सल्लागाराची नियुक्ती करण्यात येत आहे. तसेच रामटेक आदिवासी भाग असून या विकास आराखड्याच्या प्रस्तावाला आदिवासी विभागाने निधी उपलब्ध करून द्यावा. या विकास आराखड्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांमार्फत सचिव समितीकडे पाठवावा. विकास आराखड्याच्या अंमलबजावणीनंतर हा भाग देखभाल दुरुस्तीसाठी नगर परिषदेला हस्तांतरित करावा. वनक्षेत्रातील कामे वन विभागाने करावी व पुरातत्त्व विभागाने आपल्या विभागाची विकास कामे करावी, अशी सूचनाही या बैठकीत करण्यात आली. (प्रतिनिधी)
रामटेकचा २०० कोटींचा विकास आराखडा
By admin | Updated: May 21, 2016 02:55 IST