ब्रिजेश तिवारी
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : शेतकरी आजही हवामान खात्याच्या तुलनेत पंचांग, नक्षत्र व त्यांच्या वाहनांवर अधिक विश्वास ठेवतात. यंदा पावसाची राेहिणी, मृग व आर्द्रा ही महत्त्वाची नक्षत्रे संपली असून, पुनर्वसू सुरू आहे. या नक्षत्राला घाेड्याचे वाहन असल्याने त्यात भरपूर पाऊस काेसळणार असल्याचा अंदाजही पंचांगात व्यक्त केला आहे. वास्तवात, या काळात काटाेल विभागात (काटाेल व नरखेड तालुका) सतत ढगाळ वातावरण असूनही पावसाचा मात्र पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
यंदा मृग नक्षत्राला गाढव तर आर्द्राला काेल्ह्याचे वाहन हाेते. त्यामुळे त्या दाेन्ही नक्षत्रांमध्ये कमी पाऊस काेसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला हाेता. मंगळवार (दि. २०)पासून पुनर्वसू नक्षत्र सुरू झाले. याला घाेड्याचे वाहन आहे. त्यामुळे या नक्षत्रात कुठे जाेरदार तर कुठे कमी पाऊस काेसळणार असल्याचेही तसेच २० जुलै ते १५ ऑगस्ट या काळात कमी अधिक प्रमाणात पाऊस काेसळणार असल्याचे पंचांग अभ्यासक सांगतात. वास्तवात, मंगळवार (दि. २५)पर्यंत तालुक्यात फारच कमी पावसाची नाेंद करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील नदी, नाल्यांना अद्याप माेठे पूर आले नसल्याने विहिरींची पाणी पातळी जेमतेम आहे.
नागपूर जिह्यातील काही प्रकल्प १०० टक्के भरले असून, त्यातील पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तालुक्यातील जाम प्रकल्पात मात्र १२.७० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पामुळे काटाेल तालुक्यातील २२ व नरखेड तालुक्यातील २७ गावांमधील ६,५०० हेक्टर शेतीचे ओलित केले जाते. त्यामुळे ही बाब काटाेल, नरखेड तालुक्यातील संत्रा व माेसंबी उत्पादकांसाेबतच काटाेल व काेंढाळीवासीयांच्या चिंतेत भर टाकणारी आहे.
पुनर्वसूनंतर आश्लेषा, मघा, पूर्वा व उत्तरा ही पाण्याची नक्षत्रे असली तरी हा पिकांच्या वाढीचा काळ नसल्याने तसेच या काळात पिके परिपक्व हाेत असल्याने पावसामुळे पिकांचे नुकसान हाेण्याची शक्यता असते. या काळात सतत पाऊस काेसळल्यास पिकांची आंतर मशागत करण्यास अडचणी येतात. त्यानंतरची हस्त, चित्रा व स्वाती नक्षत्राच्या काळात परतीच्या पावसाची शक्यता असल्याने या काळात कापणीला आलेली पिके खराब हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
....
जाम प्रकल्पात १२.७० टक्के पाणीसाठा
जाम प्रकल्पातून काटाेल व काेंढाळीला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाताे. शिवाय, काटाेल व नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणीही दिले जाते. या प्रकल्पाची एकूण पाणी साठवण क्षमता २९ दलघमीची असून, यात रविवार (दि. २५)पर्यंत २४.३० दलघमी उपयुक्त पाणीसाठा असायला हवा. मात्र, यात उपयुक्त पाणीसाठा ७.७८५ दलघमी म्हणजेच १२.७० टक्के असल्याची माहिती जाम प्रकल्पाचे अधिकारी रिझवी यांनी दिली. या साठ्यात ४.७०० दलघमी हा मृत साठा आहे. २५ जुलै २०२० राेजी हा प्रकल्प ७० टक्के भरला हाेता, असेही रिझवी यांनी स्पष्ट केले.
...
पावसाच्या नाेंदी
जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस काेसळला असला तरी काटाेल तालुका मात्र मागे राहिला. तालुक्यात २५ जुलैपर्यंत केवळ ३५३.७३ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. यात तालुक्यातील काटोल महसूल मंडळात ३४६.९ मिमी, कोंढाळी मंडळात ४८१.४ मिमी, मेटपांजरा मंडळात २८९ मिमी, येनवा मंडळात २५४.४ मिमी, पारडसिंगा मंडळात ३४५.४ मिमी व रिधोरा मंडळात ४०५.३ मिमी पावसाचा समावेश आहे.
...