लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : पाेलिसांनी खंडाळा येथील दाेन घरी धाडी टाकून दाेन अवैध दारूविक्रेत्या महिलांना तसेच दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दाेघांना अटक केली. या पाचही जणांकडून नरखेड पाेलिसांनी २० हजार २०० रुपये किमतीची देशी दारू आणि दाेन माेटरसायकली जप्त केल्या. ही कारवाई शुक्रवारी (दि. २७) करण्यात आली.
तालुक्यातील खंडाळा व बेलाेना येथे माेठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री केली जाते. हाेळीच्या पार्श्वभूमीवर पाेलिसांनी अवैध दारूविक्रेत्यांविरुद्ध माेहीम सुरू केली आहे. या माेहिमेंतर्गत पाेलिसांनी खंडाळा (ता. नरखेड) येथील दाेन वेगवेगळ्या घरी धाडी टाकल्या. यात पाेलिसांनी एका घरून देशी दारूच्या ४८, तर दुसऱ्या घरून २४ बाटल्या जप्त केल्या, शिवाय दाेन्ही अवैध दारूविक्रेत्या महिलांना अटक केली.
याच पथकाने माेटरसायकलने स्वतंत्ररीत्या जात असलेल्या गाेपाल सुखदेव सरभैया (रा. बेलाेना, ता. नरखेड) व सुभाष चैतराम कवडती (रा. नरखेड) यांना थांबवून त्यांची झडती घेतली. त्यांच्याकडे देशी दारूच्या अनुक्रमे १२ व ९६ बाटल्या आढळून आल्या. ती दारूची अवैध वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी दाेघांनाही अटक करून त्यांच्याकडून दारूच्या बाटल्या व माेटरसायकली जप्त केल्या. या चारही कारवायांमध्ये २० हजार २०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ३६० बाटल्या जप्त केल्या, अशी माहिती ठाणेदार जयपालसिंह गिरासे यांनी दिली. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक महेश बोथले, शिपाई पृथ्वी चव्हाण, मनीष सोनोने, दिगांबर राठोड, राजकुमार सातुर, कैलास उईके, नितेश पुसाम यांच्या पथकाने केली.