हिंगणा/वाडी : एमआयडीसी (हिंगणा) पाेलिसांनी वानाडाेंगरी येथील एका अवैध दारूविक्री अड्ड्यावर धाड टाकली. त्यात एकास अटक करण्यात आली असून, अन्य एक पळून गेल्याने पाेलीस त्याचा शाेध घेत आहे. त्याच्याकडून देशीदारूच्या ८२ पेट्या आणि चारचाकी वाहन असा एकूण ५ लाख ३९ हजार ६७२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. ८) मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
आकाश बंडू झाडे (२४, रा.आदर्श कॉलनी, वानाडोंगरी, ता.हिंगणा) असे अटक करण्यात आलेल्या तर दादू ऊर्फ दिव्यांशू बंडू झाडे (२३, रा.आदर्श कॉलनी, वानाडोंगरी, ता.हिंगणा) असे पसार आराेपीचे नाव आहे. एमआयडीसी पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना, त्यांना वानाडाेंगरी येथे अवैध दारूविक्री केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी साईनगर येथील लाभलक्ष्मी अपार्टमेंट परिसरातची पाहणी केली.
यात पाेलिसांना आकाश व दिव्यांशू एमएच-४४/बी-४४४४ क्रमांकाच्या स्काॅर्पिओमध्ये दारूच्या पेट्या ठेवत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पाेलिसांनी लगेच धाड टाकून आकाशला ताब्यात घेत अटक केली. दिव्यांशू मात्र अंधाराचा फायदा घेत पळून गेला. या कारवाईमध्ये स्काॅर्पिओ, दुचाकी, देशीदारूच्या ८२ पेट्या असा एकूण ५ लाख ३९ हजार ६७२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एमआयडीसी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सहायक पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे, श्यामनारायण ठाकूर, शेख नौशाद यांच्या पथकाने केली.