आज निदर्शने : बोथलीत अतिक्रमण केल्याचे प्रकरणनागपूर : गोसेखुर्द प्रकल्पबाधित नवेगावचे बोथली येथे पुनर्वसन झाले. तेथे दुकान गाळ्याकरिता जागा उपलब्ध करण्यात येऊन सात दुकानांसाठी गाळे बांधले. मात्र त्यावर अतिक्रमण केल्याने ते काढून घेण्यात यावे, असा ठराव कुही पंचायत समितीने पारित केला होता. वास्तविक यासाठी कोणत्याही कागदपत्राची तपासणी करण्यात आली नाही, त्यामुळे त्याच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. दुसरीकडे या ठरावाविरोधात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त आंदोलन करणार आहे.कुही पंचायत समितीने १२ एप्रिल २0१३ रोजी सर्वसाधारण मासिक सभेत हा वादग्रस्त ठराव पारित केला होता. त्यात ‘बोथली पुनर्वसन या ठिकाणी तीन हजार चौरस फूट जागेवर कुही तालुक्यातील रहिवासी नसताना, घरटॅक्स पावती नसताना विलास भोंगाडे यांनी सात दुकान गाळे बांधले. बांधकाम हे अनधिकृत आहे. सदर व्यक्ती हा भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांना पुनर्वसन विभागाने हा प्लॉट कुठल्या आधारावर दिला याबाबत चौकशी करावी’ असा ठराव पंचायत समिती सदस्य हरीश कडव यांनी मांडला. या ठरावावर चर्चा करण्यात येऊन तो ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला होता.वास्तविक पाहता विलास भोंगाडे यांचा बांधकामाशी संबंध येत नाही. ‘त्या जागेवर विलास भोंगाडे यांनी अतिक्रमण केले नाही’ असे गोसेखुर्द पुनर्वसनच्या उपविभागीय अधिकार्यांनी ७ मे २0१४ रोजी कुही पंचायत समितीच्या खंडविकास अधिकार्यांना एका पत्राद्वारे कळविले. तर दुसरीकडे खंडविकास अधिकारी सुभाष जाधव यांना याबाबत विचारले असता, ‘मी बाहेर आहे. सध्या सांगणे कठीण आहे. त्यावेळी माझ्याकडे पदभार नव्हता. उद्या या सर्व माहिती देतो’ असे सांगत वेळकाढू धोरण अवलंबले. खरे म्हणजे, एक महिन्यापूर्वीच त्यांना उपविभागीय अधिकारी (पुनर्वसन) यांचे पत्र मिळाले. असे असताना त्याबाबत त्यांना काहीही कल्पना नसणे म्हणजे दिव्यच म्हणावे लागेल. एकूणच भोंगाडे यांना मानसिक त्रास कसा होईल, यासाठी कुही पंचायत समितीने केलेला हा खटाटोप असल्याचे या प्रकारावरून लक्षात येते. शासनाच्या जागेवर अतिक्रमण करून चक्क सात गाळे बांधणे हेच मुळी शक्य नाही. त्यातही पाटबंधारे विभाग म्हणते, की हे आम्ही केले आहे. त्यामुळे या प्रकारणाशी वैयक्तिकरीत्या भोंगाडे यांचा संबंध जोडणे संयुक्तिक ठरत नाही.(प्रतिनिधी)
‘त्या’ ठरावाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह
By admin | Updated: June 6, 2014 00:52 IST