योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदार पेनमाचा वेंकटेश्वर (पी.व्ही.) वर्मा ऊर्फ मुन्ना वर्मा (६१) यांच्या आत्महत्याप्रकरणात पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील एक आरोपी पुसद अर्बन को ऑपरेटिव्ह बँक अध्यक्ष शरद मैंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांना बुधवारी चौकशीसाठी पुसदमधील कार्यालयातूनच ताब्यात घेण्यात आले.
६१ वर्षीय वर्मा यांनी १ सप्टेंबर रोजी सकाळी राजनगर येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. विविध कामांचे सुमारे ४० कोटी रुपयांचे बिल थकल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले होते. शासकीय देयके वेळेवर न मिळाल्याने वर्मा यांनी काही जणांकडून मोठे कर्ज घेतले होते. व्याजापोटीच लाखो रुपये दरमहा जात होते. देयकांची थकबाकी न आल्याने व्याजाचा डोंगर वाढत चालला होता व अवैध सावकारांकडून त्यांना त्रास देणे सुरू झाले होते. वर्मा यांच्याकडे रामटेक आणि इतर काही ठिकाणी जमीन होती. ज्यांनी वर्मा यांना कर्ज दिले होते त्यांचे डोळे या जमिनींवरही होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आर्थिक कोंडी झाल्यामुळे वर्मा यांनी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. पोलिसांनी वर्मा यांच्या मोबाइलचे सखोल विश्लेषण केले. त्याच्या आधारावर पोलिसांनी शरद मैंद तसेच मनजीत वाडे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने पुसदमध्ये जाऊन मैंद यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर वाडेलादेखील अटक करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वर्मा यांनी पुसद अर्बन को ऑपरेटिव्ह बॅंकेकडून कोट्यवधींचे कर्ज घेतले होते. त्यांचे मासिक हफ्तेच मोठ्या रकमेचे होते. शरद मैंदची पत्नी पतसंस्था चालविते. त्याचे प्रमुख मैंदचे वडील आहेत. पुसद अर्बन बॅंकेचे कर्ज फेडण्यासाठी मैंदने वर्मा यांच्यावर पतसंस्थेतून कर्ज घेण्यासाठी दबाव टाकला. पतसंस्थेने वर्मा यांची संपत्ती गहाण ठेवून डमी नावाचे कर्ज दिले. कर्जाचा आकडा सातत्याने वाढतच होता. दुसरीकडे कुख्यात गुंड मनजीत वाडे हादेखील वर्मा यांना त्रास देत होता. वाडे मकोका अंतर्गत तुरुंगातदेखील गेला होता. तो अवैध सावकारी करतो. पोलिसांच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली असून, आणखी लोकांची नावेदेखील समोर येण्याची शक्यता आहे.