चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी : परिवहन व्यवस्थापकांसोबत बैठक नागपूर : कामठी - मौदा विधानसभा मतदारसंघातील प्रवाशांना स्टार बसची सुविधा मिळण्यासाठी कामठी, कोराडी, बेसा, हुडकेश्वर (खुर्द) व खापरी (रेल्वे) या पाच ठिकाणी टर्मिनल तयार करण्याचे प्रस्ताव तयार करून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात यावे, अशी मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. स्टार बस परिवहन वाहतूक व्यवस्थापक संजय काकडे यांच्या कार्यालयात मंगळवारी दुपारी बैठक पार पडली. त्यात आ. बावनकुळे यांनी ही मागणी केली. या बैठकीत स्टार बससंदर्भात विविध विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. या पाचही टर्मिनला मंजुरी प्रदान केल्यानंतर ते उभारण्यासाठी आवश्यक ते अर्थसहाय्य करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. दिघोरी नाका ते विहीरगाव आणि पारडी नाका ते वडोदादरम्यान स्टार बससेवा सुरू करण्याचे निर्देशही आ. बावनकुळे यांनी या बैठकीत दिले. गोरेवाडा-बेसा दरम्यानची स्टार बसफेरी घोगली गावापर्यंत, बर्डी-हुडकेश्वर ही बसफेरी निंबा गावापर्यंत, बर्डी-खापरी (रेल्वे) ही बसफेरी बनवाडीपर्यंत आणि भरतवाडा-पावनगाव ही बसफेरी शिरपूरपर्यंत वाढविण्याची मागणी आ. बावनकुळे यांनी केली. या स्टार बसफेऱ्या सुरू करण्यासाठी किमान १० फेऱ्यांची आवश्यकता असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत तातडीने सर्वेक्षण करून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सदर बैठकीला नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त तथा वाहतूक परिवहन व्यवस्थापक संजय काकडे, स्टार बस वाहतूक व्यवस्थापक सुकीर सोनटक्के, वंशनिमय इन्फ्रा प्रोजेक्टचे जनरल मॅनेजर संकेत पांडे, वाहतूक अधिकारी सुनील पशिने, जिल्हा परिषद सदस्य रूपराव शिंगणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
स्टार बससाठी पाच टर्मिनल प्रस्तावित करा
By admin | Updated: July 23, 2014 00:55 IST