लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बडेगाव शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विनाराॅयल्टी वाहतूक करणारा टिप्पर पकडला. यात टिप्पर व रेती असा एकूण २५ लाख १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. १५) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खापा परिसरात गस्तीवर हाेते. त्यांना बडेगाव (ता. सावनेर) शिवारातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या शिवारात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. दरम्यान, त्यांनी एमएच २७ बीएक्स ७११४ क्रमांकाचा टिप्पर थांबवून झडती घेतली. त्या टिप्परमध्ये कन्हान नदीतील रेती आढळून येताच कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली. ती रेती विनाराॅयल्टी असल्याचे स्पष्ट झाले.
पाेलिसांनी टिप्परसह रेती जप्त केली. या कारवाईमध्ये २५ लाख रुपयांचा टिप्पर आणि १४ हजार रुपयांची सात ब्रास रेती असा एकूण २५ लाख १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. याप्रकरणी खापा पाेलिसांनी टिप्पर चालक व मालकाविरुद्ध भादंवि ३७९, १०९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक फाैजदार विजय बारई करीत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक राजीव कर्मलवार यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.