गोळी झाडून जेसीबी चालकाला ठार मारणाऱ्या प्रॉपर्टी डिलरला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:34 AM2019-01-08T00:34:06+5:302019-01-08T00:35:03+5:30
जमिनीच्या वादातून बंदुकीची गोळी झाडून जेसीबी चालकाचा खून करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. राठी यांनी हा निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जमिनीच्या वादातून बंदुकीची गोळी झाडून जेसीबी चालकाचा खून करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. राठी यांनी हा निर्णय दिला.
प्रवीण भास्कर बोरकुटे (४९) असे आरोपीचे नाव असून, तो लक्ष्मीनगर येथील रहिवासी आहे. त्याला खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेप व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावास तर, ठार मारण्याची धमकी देण्याच्या गुन्ह्यामध्ये ३ वर्षे कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. त्याला ७ डिसेंबर २०११ रोजी अटक करण्यात आली होती.
ही घटना ७ डिसेंबर २०११ रोजी अजनी पोलिसांच्या हद्दीत घडली होती. गोकुलपेठ येथील फिर्यादी सुधांशु डेग्वेकर यांनी आरोपीच्या मोठ्या भावासोबत बोरकुटे ले-आऊट येथील जमीन खरेदीचा करार केला होता. या जमिनीचे लेव्हलिंग सुरू असताना आरोपी तेथे गेला व त्या जमिनीवर मालकी हक्क सांगितला. तसेच, जमिनीवर बांधकाम केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, त्याने जेसीबी चालक रामलाल धुर्वे (३५) याच्या दिशेने बंदुकीची गोळी झाडली. ती गोळी कपाळावर लागल्यामुळे धुर्वे जागेवरच ठार झाला. तो विणकर कॉलनी, मानेवाडा येथील रहिवासी होता. फिर्यादीच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला. पोलीस निरीक्षक आर. एम. काटोले यांनी प्रकरणाचा तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. जयंत अलोणी यांनी कामकाज पाहिले.