लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता : पश्चिम बंगालच्या पहिल्या टप्प्याचे मतदान शनिवारी (दि.२७) होणार आहे. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता प्रचारतोफा थंडावल्या. पहिल्या टप्प्यात ३० जागांवर मतदान होणार आहे. एकेकाळी डाव्यांचा प्रभाव असलेल्या या जागांवर तृणमूल व भाजपनेदेखील संपूर्ण ताकद ओतली आहे.
शनिवारी आदिवासीबहुल पुरुलिया, बांकुरा, झारग्राम, पूर्व मेदिनीपूर या जिल्ह्यांतील ३० जागांवर मतदान होणार आहे. या जागांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे प्रचारात उतरले होते. पहिल्या टप्प्यात विविध राजकीय पक्षांचे एकूण १९१ उमेदवार रिंगणात आहेत.
मतदानाअगोदर हटविले आयएएस, आयपीएस अधिकारी
पहिल्या टप्प्याचे मतदान होण्याअगोदर निवडणूक आयोगाने एक आयएएस व चार आयपीएस अधिकाऱ्यांना हटविले आहे. झाडग्रामच्या जिल्हाधिकारी आएशा रानी यांचा त्यात समावेश आहे. या अधिकाऱ्यांविरोधात विरोधी पक्षांकडून तक्रारी वाढल्या होत्या. हे अधिकारी निवडणुकीत गैरप्रकार करू शकतात अशीदेखील तक्रार होती. त्यामुळे आयोगाने त्यांना हटविले आहे.