नागपूर : समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना द्यावयाचे मोफत गणवेश खरेदीकरिता काही पुरवठादारांकडून जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा संदर्भ दिसा जात आहे. तर गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांकडून काही पुरवठादाराकडून खरेदी गणवेश खरेदी करण्याच्या मौखिक सूचना करण्यात येत आहे. हा प्रकार शाळा व्यवस्थापन समितीच्या अधिकारावर अतिक्रमण करणारा असून, मुख्याध्यापक व व्यवस्थापन समितीमध्ये वाद निर्माण होत आहे.
गणवेशासाठीचा निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा झाला आहे. यावर्षी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने एकसुत्रता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना एकाच रंगाचा गणवेश देण्याचा ठराव घेतला. यंदा शाळा सुरू झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांना एकच गणवेश देण्यात येणार आहे. गणवेशाचा निधी आला असल्याने शाळांच्या मुख्याध्यापकांना काही ठराविक पुरवठादाराकडून दूरध्वनीचे माध्यमातून संपर्क करून तुमच्या तालुक्यातील मोफत गणवेश पुरवठा आमच्याकडे सोपवलेला आहे. त्यासाठी जि.प.मधील एका सबंधीत पदाधिकारी यांचे नाव सांगून त्यांचा संदर्भ दिला जातो आहे.
तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे गणवेश अमुक पुरवठादाराकडूनच खरेदी करा, अशा सूचना वरिष्ठांच्या असल्याचे गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून व केंद्र प्रमुखांकडून मुख्याध्यापकांना सांगितले जात आहे. काही केंद्रप्रमुख गणवेश खरेदी बाबतच्या ठराविक पुरवठादारांच्या निविदा मुख्याध्यापक सभेच्या माध्यमातून पोहचवत असून, त्यांचेकडूनच गणवेश खरेदी करावा, असा मौखिक निरोप मुख्याध्यापकांना दिला जात आहे.
पुरवठादाराकडून गणवेश खरेदीसाठी वाढलेला दबावाची तक्रार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे लीलाधर ठाकरे, अनिल नासरे, प्रकाश सव्वालाखे, हेमंत तितरमारे, दिगांबर ठाकरे आदींनी सीईओ व शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.
- गणवेशाच्या रंगासंदर्भातील ठराव जि.प. शिक्षक समितीने घेतला. पण शाळा व्यवस्थापन समितीला कुठेही सक्ती केली नाही. जिल्हास्तरावर असे कोणतेही पुरवठादार ठरविलेले नाही. गणवेशाच्या खरेदीचे सर्व अधिकारी शाळा व्यवस्थापन समितीला आहे. आम्ही जिल्हास्तरावरून कुठलेही पत्र, आदेश, मौखिक सूचना दिलेल्या नाही.
चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी, जि.प.