नागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर करण्यात आलेल्या यंदाच्या राष्ट्रपती पदकाच्या यादीत नागपूर महापालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन विभागाचे सहायक स्टेशन अधिकारी धर्मराज नाकोड यांना गुणवंत सेवेसाठी ‘राष्ट्रपती पदक’ (अग्निशमन सेवा पदक) जाहीर झाले आहे. नाकोड हे ३० नोव्हेंबर २०२० रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.
धर्मराज नाकोड यांनी ७ जून १९८४ ला अग्निशमन सेवेत फायरमन म्हणून सेवा कारकीर्दीची सुरुवात केली. पुढे त्यांना लिडिंग फायरमन, सबऑफिसर, सहायक स्टेशन अधिकारी या पदांवर बढती मिळाली. तसेच त्यांच्याकडे नरेंद्रनगर फायर स्टेशनचासुध्दा अरितिक्त भार होता.
नाकोड हे एम. ए. असून, त्यांनी नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमधून ‘स्टेशन ऑफिसर आणि इन्स्ट्रक्टर’ कोर्स पूर्ण केला आहे. या कॉलेजमधून १० विविध प्रशिक्षण पूर्ण केले. २००३ च्या ४१ ‘ॲडव्हान्स रेस्क्यू कोर्स’मध्ये त्यांना गोल्ड मेडल देण्यात आले. त्यांनी मॉकड्रिल, लेक्चर्स, लाइव्ह फायर, फायर सेफ्टी अवेयरनेस प्रोग्राम आयोजित केले. अग्निशामक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, मल्टिप्लेक्स, मॉल, रुग्णालय, शाळा, गोडावून आदी गगनचुंबी व विशेष इमारतींची तपासणी केली आहे.
...
नाकोड यांनी केलेले उल्लेखनीय कार्य
- २००१ मध्ये गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे झालेल्या मोठ्या भूकंपावेळी नागपूर महापालिकेच्यावतीने धर्मराज नाकोड यांना शोध व बचाव मोहिमेत तैनात करण्यात आले होते.
- ३ डिसेंबर २०१२ रोजी बहुमजली कोल्डस्टोअरेज बिल्डिंग कोसळलेल्या ठिकाणी त्यांनी बचावकार्याचे नेतृत्व केले व मोडकळीस आलेल्या इमारतीत घुसून त्यांनी ४ लोकांचे प्राण वाचवले.
- २०१३ मध्ये नाशिक येथे किंग्ज इन्फोमेडिया (पी) लिमिटेड आणि नाशिक महापालिकेद्वारे आयोजित कार्यक्रमात ‘सेफ इंडिया हिरो प्लस अवॉर्ड’ देऊन नाकोड यांना सन्मानित करण्यात आले.
- २०१६ मध्ये त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील राका गावात शेताच्या खुल्या बोरवेलमधून एका मुलाला सुखरूप बाहेर काढले होते.
- ९ डिसेंबर २०१८ रोजी जगन्नाथ बुधवारी येथील सूतगिरणीला लागलेल्या आगीच्या घटनेत धुराच्या आत तीन मजल्यावरील अडकलेल्या २ महिलांचे प्राण वाचवले.
नाकोड शिस्तप्रिय अधिकारी
धर्मराज नाकोड यांनी आपली कर्तव्ये कुशल कार्यक्षमतेने पार पाडली. ते प्रामाणिक, मेहनती आणि आपल्या सेवेला समर्पित कर्मचारी होते. त्यांनी आपल्या ३६ वर्षांच्या सेवा कारकीर्दीत धैर्य, साहस आणि उच्च शिस्तीचे प्रदर्शन केले.
राजेंद्र उचके, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा