ंनागपूर : जातीचे प्रमाणपत्र केवळ दोन दिवसात तयार करून मिळत आहे, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे. जात प्रमाणपत्रासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयातील ’सेतू’च्या वारंवार चकरा मारण्याची गरज नाही. कारण अर्ज स्वीकारल्यानंतर त्यासंबंधातील प्रत्येक माहिती तुम्हाला ‘एसएमएस’वर लगेच उपलब्ध करून दिली जात आहे. अर्ज स्वीकृत झाले किंवा नामंजूर झाले, याची माहिती लगेच दिली जात आहे. परिणामी वेळेची बचत होत असून, दोन ते तीन दिवसात प्रमाणपत्र तयार होत आहेत. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पदभार स्वीकारताच कामाचा सपाटा लावला आहे. ते स्वत: नागरिकांसाठी जास्तीतजास्त वेळ देत आहेत. एखाद्या लहान प्रमाणपत्रासाठीसुद्धा नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वारंवार चकरा माराव्या लागतात. महिनोन्महिने काम होत नाही. काही त्रुटी सांगितल्या जातात. त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त होतो. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुर्वे यांनी ‘एसएमएस सेवे’ची सुरुवात केली. या सेवेंतर्गत सेतू कार्यालयामध्ये विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक नागरिकाकडून त्याचा मोबाईल क्रमांक घेतला जातो. त्याने अर्ज सादर करताच त्यात कोणत्या त्रुटी आहेत, आणखी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची गरज आहे, याची माहिती एसएमएसद्वारा दिली जाते. त्यामुळे संबंधितांना लगेच त्रुटी पूर्ण करता येणे शक्य आहे. यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांसाठी प्रमाणपत्राला सर्वाधिक उशीर होत असे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध उपजिल्हाधिकाऱ्यांना एकेक दिवस निश्चित करून दिले आहेत. प्रत्येकाचे दिवस ठरवून देण्यात आले असून, त्या त्या दिवशी उपजिल्हाधिकारी सेतू कार्यालयात बसतात आणि प्रमाणपत्रांवर स्वाक्षरी करतात. परिणामी प्रमाणपत्रासाठी फार वेळ लागत नाही. एसएमएस सेवा सुरू होऊन आता केवळ एक आठवडाच झाला असून, या सेवेचे चांगले परिणाम दिसून येत आहे. सध्या ही सुविधा जात प्रमाणपत्र, डोमीसाईल आणि नॉन क्रिमिलेअरसाठी उपलब्ध आहे. प्रमाणपत्र हे जास्तीतजास्त सात दिवसांत तयार व्हावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असले तरी, एसएमएस सुविधेमुळे दोन ते तीन दिवसांतच प्रमाणपत्र तयार होत आहेत. (प्रतिनिधी)नागरिकांची कामे तातडीने व्हावीत शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला वारंवार चकरा मारण्याची वेळ येऊ नये. त्याचे काम शक्य तितक्या लवकर होणे गरजेचे आहे. या दिशेने आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. प्रशासनातील इतर कामेही अशीच गतिमान करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची त्याला चांगली साथ मिळत आहे.सचिन कुर्वे, जिल्हाधिकारी
जात प्रमाणपत्र दोन दिवसात तयार
By admin | Updated: June 2, 2015 02:16 IST