‘डागा’त आले ‘कलर डॉपलर’ : रुग्णांची धावपळ थांबणारनागपूर : डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातील रुग्णांवर अत्याधुनिक उपचार व्हावे म्हणून डागा प्रशासनाने ‘कलर डॉपलर’चा प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वी शासनाकडे पाठविला होता. शासनाने मंजुरी दिल्याने शनिवार २७ सप्टेंबरला ‘कलर डॉपलर’ डागा रुग्णालयात दाखल झाले. यामुळे आता गरोदर महिला रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळणार आहेत.डागा रुग्णालयात नागपूर, विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड व आंध्र प्रदेश आदी राज्यातूनही हजारो गरीब महिला रुग्ण तपासणी व ‘डिलीव्हरी’साठी येतात. मेडिकलसह डागाही गरीबांचे रुग्णालय म्हणून ओळखले जाते. डागा रुग्णालयात दिवसाकाठी ७० ते ८५ गरोदर महिला रुग्णांची सोनोग्राफी केली जाते, तर ३५ ते ४० महिलांची ‘डिलीव्हरी’ होते. सोनोग्राफी करीत असताना अनेक गरोदर महिला ‘क्रिटीकल’ अवस्थेत असतात. सोनोग्राफीत त्यांचे व्यवस्थित निदान होत नाही. व्यवस्थित निदान न झाल्यास उपचार करण्यात अनेक अडचणी निर्माण होतात. परिणामी, मृत्यू होण्याचीही शक्यता असल्याने डागा प्रशासनाकडून अधिकच्या तपासणीसाठी गरोदर महिलांना मेयो रुग्णालयात पाठविण्यात येते. मेयो रुग्णालयातील ‘कलर डॉपलर’वर महिलांची अत्याधुनिकपणे तपासणी झाल्यानंतर तेथील अहवाल घेऊन महिलांना परत डागा रुग्णालयात यावे लागत होते. डागाच्या तत्कालीन वैद्यकीय अधिक्षिका डॉ. वैशाली खेडीकर यांनी रुग्णहितार्थ मार्च २०१४ मध्ये ‘कलर डॉपलर’ मिळण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडे पाठविला होता. शासनाने प्रस्तावावर विचार करून डागासाठी १६ लाखांचे ‘कलर डॉपलर’ मंजूर केले. शनिवारी २७ सप्टेंबर रोजी सॅमसंग कंपनीचे ‘कलर डॉपलर’ यंत्र डागा रुग्णालयात दाखल झाले. आता या यंत्रावर तपासणी होणार असल्याने गरोदर महिलांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे. (प्रतिनिधी)
गर्भवती महिलांना मिळणार अत्याधुनिक उपचार
By admin | Updated: October 6, 2014 00:54 IST