नागपूर : पत्नीने दुसरे लग्न केल्याने संतापलेल्या युवकाने गर्भवती महिलेचा गळा कापून खून केला. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील भीमनगर येथे घडली. रिता प्रमोद येवले (२२) असे मृत महिलेचे नाव आहे तर परमानंद दिलीप भालेराव (३०) असे आरोपीचे नाव आहे. तो फरार आहे. परमानंद एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये काम करतो. तो वाडीत राहतो. तीन वर्षांपूर्वी त्याचे रितासोबत लग्न जाले. लग्नापासूनच तो तिला त्रास देत होता. त्यांच्यात नेहमीच वाद व्हायचे. त्यामुळे रिताने त्याच्याशी घटस्फोट घेतला होता. एक वर्षाची मुलगी दीक्षासोबत ती आपल्या आईवडिलांकडे गोंदियाला राहत होती. यादरम्यान रिता प्रमोद येवलेच्या संपर्कात आली. तिने दहा महिन्यांपूर्वी प्रमोदसोबत लग्न केले. प्रमोद मजुरी करतो. दोघेही भीमनगरात राहू लागले. रिताने नवीन संसार सुरू केल्याचे परमानंदला आवडले नाही. नेहमीप्रमाणे सकाळी प्रमोद कामावर निघून गेला. घरी रिता व प्रमोदचा १५ वर्षीय मावस भाऊ घनश्याम कांबळे होता. रिता वस्तीतील एका ओळखीच्या व्यक्तीकडे गेली होती. सकाळी ११ वाजता परमानंद रिताच्या घरी आला. त्याने घनश्यामला तिला बोलावून आणण्यास सांगितले. जेव्हा रिता घरी पोहोचली तेव्हा परमानंदला पाहून ती घाबरली. ती परत जाऊ लागली. परमानंदने तिला पकडून झोपडीत आणले आणि धारदार शस्त्राने तिचा गळा कापला. रिताचा खून करून परमानंद फरार झाला. मिळालेल्या माहितीनुसार परमानंद हिंसक व संशयी स्वभावाचा होता. (प्रतिनिधी)मुलगी झाली अनाथ या घटनेमुळे एक वर्षाची दीक्षा अनाथ झाली. घटनेच्यावेळी ती सुद्धा उपस्थित होती. प्रमोद आणि रिताचे कुटुंबीय मजुरी करतात.
गर्भवती महिलेचा खून
By admin | Updated: April 18, 2016 05:22 IST