योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूरला दाखल गुन्ह्यात तेथील न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळाला आहे. मात्र नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, रात्री उशीरा कोरटकरचा व्हिडीओ व्हायरल झाला व त्याने त्यात छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा केला आहे. कारवाईच्या भीतीपोटी कोरटकर नमल्याचीच चर्चा सुरू झाली आहे.
प्रशांत कोरटकर याच्याविरुद्ध कोल्हापूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता. शिवाय नागपूर पोलिसांनीही गुन्हा दाखल केला. कोरटकर मागील पाच दिवसांपासून फरार असून, विविध ठिकाणी त्याचा शोध घेण्यात येत आहे. तो त्याच्या नातेवाइकांना भेटण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी त्यांच्यावर वॉच ठेवला आहे. सकल मराठा समाजाच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिस ठाण्यात गुन्हा तर दाखल झाला होता. मात्र तो गुन्हा आता कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा तपासदेखील कोल्हापूर पोलिसच करणार आहेत. तेथील पथक तीन दिवसांअगोदरच नागपुरात पोहोचले होते. आता कोल्हापूर गुन्हे शाखेचे पथकदेखील तपासासाठी नागपुरात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
फरार कोरटकरचा व्हिडीओ व्हायरलदरम्यान, फरार असलेल्या प्रशांत कोरटकर याचा व्हिडीओ रविवारी रात्री व्हायरल झाला. त्याने या प्रकरणाबाबत कुठलीही माफी मागितली नाही. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांवर स्तुतीसुमने उधळली. छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे महाराष्ट्राला जगभरात ओळखले जाते. त्यांच्या कथा ऐकून लहानाचे मोठे झालो आहे. त्यांच्या कथा अजूनही प्रेरणा देतात. छत्रपतींची राजधानी असलेल्या रायगडला अनेकदात अनेकदा भेट दिली व नतमस्तक झालो. त्यांना मी मानाचा मुजरा करतो, असे कोरटकरने व्हिडीओत म्हटले आहे. दरम्यान, कोरटकरचा व्हिडीओ हा एखाद्या कार्यालयातील दिसून येत आहे. तो व्हिडीओ काही पत्रकारांपर्यंत पोहोचविण्यात आला. आता पोलीस व्हिडीओ कुठून व्हायरल झाला याची चौकशी किती वेगाने करतात हा प्रश्न उपस्थित होत आहे.
अधिवेशनाच्या तोंडावर सहकार्याची भूमिका ?सोमवारपासून विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरटकरचा मुद्दा वादळी ठरू शकतो. हे पाहता कोरटकरकडून पोलिसांना सहकार्याची भूमिका घेतली जाऊ शकते. आता तो सायबर सेलकडे मोबाईल व सीमकार्ड तपासाकडे पोहोचविणार का हा सवाल कायम आहे.