विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या शिफारशीसाठी बनावट लेटरपॅडचा वापर केल्याचा संशयनागपूर : भारतीय विद्या भवन्समध्ये चार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या शिफारशीसाठी बनावट लेटरपॅडचा वापर करून फसवेगिरी केल्याचा संशय असल्याने प्रदीप वसंत गाडगे याने अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेला जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. सिव्हिल लाईन्स येथील भारतीय विद्या भवन्स या संस्थेचे विजय योगराज ठाकरे हे रजिस्ट्रार आहेत. २०१६-१७ या वर्षांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान विविध चार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरिता ‘महाराष्ट्र स्टेट जर्नालिस्ट युनियन फाऊंडर अॅन्ड प्रेसिडेंट प्रदीप गाडगे, डिव्हिजनल आॅफिस राजे रघुजीनगर सक्करदरा’अशा लेटरपॅडवर शिफारससंदर्भातील मजकूर टंकलिखित करून पाठविण्यात आल्याचे तसेच भवन्सशी संलग्न असलेल्या ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड दिल्ली’च्या अध्यक्षाच्या नावाचे टंकलिखित शिफारसपत्र पाठविण्यात आल्याचे ठाकरे यांच्या निदर्शनास आले. ८ फेब्रुवारी ते २९ एप्रिल २०१६ या काळात हा प्रकार आढळून आला. ही फसवेगिरी असल्याचे लक्षात येताच ठाकरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून ३० एप्रिल २०१६ रोजी सीताबर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४७३, ४७६ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस चौकशीच्या घेऱ्यात अडकून अटकेची भीती असल्याने सक्करदरा रघुजीनगर येथील रहिवासी प्रदीप वसंतराव गाडगे (४५) याने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने प्रकरण गंभीर असल्याने फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील पंकज तपासे यांनी काम पाहिले. या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एम.पी. पुरी हे आहेत. (प्रतिनिधी)
प्रदीप गाडगेचा जामीन फेटाळला
By admin | Updated: May 19, 2016 02:54 IST