लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : शहरात काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रकारामुळे घरातील विजेची उपकरणे निकामी हाेण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे ही समस्या तातडीने साेडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पावसाची सर काेसळल्यास किंवा हवा थाेडी वेगात वाहायला सुरुवात झाल्यास वीजपुरवठा खंडित हाेताे. खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत व्हायला बराच वेळ लागताे. दमट वातावरणामुळे उकाडा हाेत असल्याने अनेकांना आजही कूलरचा वापर करावा लागताे. वीजपुरवठा मध्येच खंडित हाेत असल्साने गरमीमुळे लहान मुलांसह वयाेवृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागताे. शहरात भूमिगत विद्युत केबल टाकण्यात आली आहे. त्यामुळे वीज चाेरीला आळा बसला तरी लपंडावाचा ससेमिरा सुटला नाही.
या प्रकारामुळे शहरातील बँका, नागरिकांची ऑनलाइन व कार्यालयीन कामे, रुग्णालयांमधील रुग्णांसह व्यावसायिकांना फटका बसला आहे. विद्युत सेवेत कुठलीही सुधारणा केली जात नसून, बिलांची रक्कम मात्र वाढत आहे आणि ती वसूल केली जात आहे, असा आराेप काही ग्राहकांनी केला. महावितरण कंपनीमध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्याने ही समस्या उद्भवल्याची माहिती कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी दिली. लहान मुलांसह नागरिकांचे आराेग्य व घरांमधील विजेची उपकरणे लक्षात घेता ही समस्या तातडीने साेडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.