महावितरण : ५६०.४४ कोटींची स्मार्ट सिटी योजना नागपूर : महावितरण कंपनीने शहरातील वीज वितरण यंत्रणा ‘स्मार्ट’ करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यात तब्बल ५६० कोटींची कामे प्रस्तावित करण्यात आली असून भविष्यातील विजेच्या वाढत्या मागणीचे नियोजन करण्यासाठी या योजनेत अनेक ठिकाणी भूमिगत वाहिनीसह शहरातील दहा ठिकाणी नवीन उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. नागपूर शहराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे भविष्यात विजेच्या मागणीचे योग्य नियोजन व्हावे, आणि ग्राहकांना अपघातविरहीत आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणने वीज यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी ५६०.४४ कोटीची स्मार्ट सिटी योजना आखली आहे. यात कॉग्रेसनगर विभागातील दीक्षाभुमी आणि सोमलवाडा, बुटीबोरी विभागातील दाभा तसेच वितरण फ्रेÞन्चायजी भागातील गांधीबाग, कोराडी रोड, गोविंद भवन, जयदुर्गा (मनीष नगर), सुगत नगर, मानेवाडा आणि ए.एफ.ओ अशा दहा ठिकाणी ३३/११ केव्ही क्षमतेची उपकेंद्रांचा समावेश आहे. सोबतच कॉग्रेसनगर विभागातील ३३/११ केव्हीच्या एका उपकेंद्राची क्षमतावाढीचाही प्रस्ताव असून कॉग्रेसनगर विभागातील ३ तर वितरण फ्रÞेन्चायजी भागातील उपकेंद्रामध्ये अतिरिक्त रोहित्र उभारण्याचाही प्रस्ताव आहे. या प्रस्तावित योजनेत कॉग्रेसनगर, दाभा आणि वितरण फ्रÞेन्चाईजी भागात तब्बल २५८.८ किमी लांबीची ३३ केव्ही उच्चदाब भूमिगत वाहिनी टाकणार आहे. तसेच ९८ किमी लांबीची ११ केव्ही उच्चदाब भूमिगत वाहिनी टाकणार आहेत. (प्रतिनिधी)
वीज वितरण ‘स्मार्ट’ होणार
By admin | Updated: March 4, 2017 01:52 IST