नागपूर : सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण व सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करण्याच्या प्रकरणात यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीचे माजी आमदार राजू नारायण तोडसाम यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली, तसेच तोडसाम यांना १५ हजार रुपयांचे वैयक्तिक बंधपत्र व तेवढ्याच रकमेचा सक्षम जामिनदार सादर करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा दिलासा दिला.
या प्रकरणात २७ नोव्हेंबर २०१५ रोजी केळापूर येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने तोडसाम यांना ३ महिने कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. २१ जानेवारी २०२१ रोजी सत्र न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवून तोडसाम यांचे अपील खारीज केले. परिणामी, तोडसाम यांनी उच्च न्यायालयात रिव्हिजन याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी शिक्षेवर स्थगिती व जामीनासाठीही अर्ज दाखल केला होता. तो अर्ज मंजूर करण्यात आला, तसेच मूळ याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेण्यात आली. तोडसाम यांच्यातर्फे वरिष्ठ वकील सुनील मनोहर यांनी कामकाज पाहिले.
-----------
असे आहे प्रकरण
२०१४ मध्ये तोडसाम यांनी नागरिकांना अधिक वीज बिल येत असल्याच्या कारणावरून पांढरकवडा येथील महावितरणचे लेखापाल विलास आकोत यांच्यासोबत वाद घातला. त्यांना मारहाण व अश्लील शिवीगाळ केली. ठार मारण्याची धमकी दिली, अशी पोलीस तक्रार होती. तोडसाम यांच्याविरुद्ध पांढरकवडा पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता.