लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धरमपेठ येथील चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कच्या संचालनाकरिता खासगी ऑपरेटर नियुक्त करण्यासाठी जारी टेंडरवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी स्थगिती दिली. तसेच, या टेंडरला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर अंतिम निर्णय राखून ठेवला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ही याचिका सिव्हिक अॅक्शन गिल्ड फाऊंडेशनने दाखल केली आहे. पाच वर्षे कालावधीसाठी खासगी आॅपरेटर नियुक्त करण्याकरिता १० जुलै २०२० रोजी टेंडर नोटीस जारी करण्यात आली होती. गुरुवारी (६ आॅगस्ट) कंत्राटदारांचे टेंडर उघडले जाणार होते. तत्पूर्वी, उच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती दिल्यामुळे मनपाला जोरदार दणका बसला.शहराच्या विकास आराखड्यात ही जमीन पार्ककरिता आरक्षित आहे. त्यामुळे मनपाने स्वत: या जमिनीवर पार्क विकसित करायला पाहिजे व नागरिकांना त्यांचा नि:शुल्क उपयोग करता आला पाहिजे. परंतु, मनपाने पार्कचे व्यावसायिकीकरण करण्याचा निर्णय घेतला. खासगी आॅपरेटर नियुक्त केल्यास या पार्कचा खाणे-पिणे, लग्नसमारंभ, मेळावे यासह विविध मनोरंजनासाठी उपयोग केला जाईल. परिणामी, पार्कच्या मूळ उद्देशाची पायमल्ली होईल. हे पार्क मुलांना खेळण्यासाठी व ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी सुरक्षित ठिकाण आहे असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.पार्कमध्ये सध्या असामाजिक तत्त्वांचा वावर असतो. ते पार्कमध्ये दारू पितात. प्रेमीयुगुल अश्लील चाळे करतात. सफाई केल्यानंतर प्रत्येकवेळी दारूच्या बॉटल्स व इतर आक्षेपार्ह वस्तू आढळून येतात. यासंदर्भात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी केल्या, पण काहीच कारवाई करण्यात आली नाही, असा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यातर्फे वरिष्ठ वकील अनिल मार्डीकर व अॅड. तुषार मंडलेकर तर, मनपातर्फे अॅड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.
चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क संचालनाकरिता खासगी ऑपरेटर नियुक्तीवर स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 20:58 IST
धरमपेठ येथील चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कच्या संचालनाकरिता खासगी ऑपरेटर नियुक्त करण्यासाठी जारी टेंडरवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी स्थगिती दिली. तसेच, या टेंडरला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर अंतिम निर्णय राखून ठेवला.
चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क संचालनाकरिता खासगी ऑपरेटर नियुक्तीवर स्थगिती
ठळक मुद्देहायकोर्टाचा मनपाला दणका : टेंडरला आव्हान देणाऱ्या याचिकेवर निर्णय राखून