लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपल्या अपयशाचं खापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फोडत आहे. वास्तविक राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आणि मराठा आरक्षण गेले, असा आरोप करीत तुम्हाला जमत नसेल तर आरक्षणाच्या मोहिमेची सूत्रे आमच्या ताब्यात द्या, ओबीसीला आरक्षण देताे. नाही दिले तर राजकीय संन्यास घेईल, असे आव्हान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने शनिवारी नागपुरात व्हेरायटी चौकात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन केले. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. ओबीसी आरक्षणाचे मारेकरी कोण आहे हे लोकांना कळले पाहिजे. वाशिममधील काँग्रेसच्या आमदाराचा मुलगा आणि भंडारा जिल्हा परिषदेच्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचे काम ७० वर्षांनंतर मोदी सरकारने केले. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने हे काम केलेले नाही. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ओबीसींसाठी वेगळे खाते निर्मांण केले. स्वतंत्र आर्थिक तरतूद केली. ५० टक्क्यावरीलही आरक्षण आम्ही वाचवलं होते. पण सरकारमुळे ते गेले. राज्य सरकारने एक मागासवर्गीय आयोग नेमायचा होता आणि या आयोगाला इंम्पेरिकल डाटा गोळा करण्यासाठी एक एजन्सी नेमायची होती. त्यानंतर ते एका अॅफिडेव्हीटच्या माध्यमातून न्यायालयात सादर करावयाचे होते. त्यामुळे ५० टक्क्यांच्या आतील सर्व आरक्षण अबाधित राहिले असते, असेही फडणवीस म्हणाले.
आंदोलनात आ. विकास कुंभारे, आ. गिरीश व्यास, माजी आ. अनिल सोले, सुधाकर कोहळे, उपेंद्र कोठेकर, प्रकाश भोयर, धर्मपाल मेश्राम, अर्चना डेहनकर, संजय भेंडे, संजय बंगाले, नरेश बरडे, बाल्या बोरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. संचालन भाजपा ओबीसी मोर्चाचे शहर अध्यक्ष रमेश चोपडे यांनी केले.
....
देशात आरक्षण असताना महाराष्ट्रातच का नाही?
देशाच्या प्रत्येक राज्यात ओबीसींचे आरक्षण असताना महाराष्ट्रातच का नाही असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्य सरकारने ओबीसींना आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी वेळकाढूपणा केला. १५ महिने राज्य सरकारने न्यायालयात अॅफिडेव्हिटच सादर केलं नाही. यासाठी सात वेळा तारखा घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण देशात केवळ महाराष्ट्रात ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले. याला केवळ राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
फडवीसांना पोलिसांनी ताब्यात घेतले
व्हेरायटी चौकात आयोजित चक्काजाम आंदोलनात सहभागी झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासह आंदोलकांनी अटक करून घेतली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. खासदार डॉ. विकास महात्मे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे शहर अध्यक्ष आ. प्रवीण दटके, महापौर दयाशंकर तिवारी, आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार सुधाकर देशमुख, अविनाश ठाकरे यांच्यासह पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांना पाेलिसांनी ताब्यात घेतले.