नागपूर : कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक सुधारणा करण्यास केंद्र सरकारची भूमिका अत्यंत सकारात्मक आहे. आर्थिक सुधारणांच्या दृष्टीने सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले असून त्याचे परिणाम लवकरच दिसतील, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.‘इंडियन बिझिनेस अॅॅन्ड प्रोफेशनल कौन्सिल’च्या पदाधिकाऱ्यांशी गडकरी यांनी रविवारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’च्या माध्यमातून संवाद साधला. कोरोनाचे संकट हे तात्पुरते संकट आहे हे सर्वांनी लक्षात ठेवून निराशेतून बाहेर पडले पाहिजे, असेही गडकरी यांनी सांगितले. देशात आज सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांचे महत्त्व वाढले आहे. उच्च आणि अद्ययावत तंत्रज्ञान, कौशल्य असलेले मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध आहे. याचा उपयोग करून निर्यातवाढीवर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले.
आर्थिक सुधारणांच्या निर्णयांचे सकारात्मक परिणाम लवकरच- नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 05:19 IST