नागपूर : लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या कुटुंबाचा आधार ठरलेल्या रेशन धान्य दुकानदारांनी दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये सरकारच्या विरोधात असहकार आंदोलनाचा इशारा दिला आहे. रेशन वितरण प्रणालीतील पॉस मशीन रेशन दुकानदारांसाठी अडचणीची ठरत आहे. त्यामुळे रेशन दुकानदार पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे या मशीनद्वारे धान्य वितरण थांबवावे, अशी मागणी रेशन धान्य दुकानदारांची आहे. शासनाने मागणीकडे दुर्लक्ष केल्यास १ मेपासून पॉस मशीन शासनाला परत करण्याचा निर्णय रेशन दुकानदार संघटनेने घेतला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत नागपूर जिल्ह्यातील नऊ रेशन दुकानदारांचा मृत्यू झाला होता. तरीसुद्धा लॉकडाऊनच्या काळात रेशन धान्य दुकानदारांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना वाटप केले. तेव्हासुद्धा रेशन दुकानदारांकडून ऑफलाईन धान्य वितरण करण्याची मागणी करण्यात आली होती. काही कालावधीसाठी ऑफलाईन वितरणाला मुभा दिली, नंतर पुन्हा पॉस मशीनद्वारे धान्याचे वितरण सुरू करण्यात आले. दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त घातक आहे. मार्च महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील ३५ रेशन धान्य दुकानदार पॉझिटिव्ह आले आहेत. पाच दुकानदारांची अवस्था अत्यंत बिकट आहे. रेशन दुकानदार पॉझिटिव्ह येण्याला पॉस मशीन जबाबदार ठरत आहे.
लॉकडाऊनच्या काळात रेशन दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांना रेशन पुरविले. पण आठ महिन्याच्या डाळीचे कमिशन दुकानदारांना मिळाले नाही. दोन महिन्याचे मक्याचे कमिशन मिळाले नाही. रेशन दुकानात गर्दी वाढल्यास मनपाचे पथक कारवाई करते. या सर्व अडचणीसंदर्भात विभागाच्या अधिकाऱ्यांना व मंत्रालयस्तरावरील सचिवांनाही पत्रव्यवहार वेळोवेळी केला आहे. पण रेशन धान्य दुकानदारांच्या सुरक्षेबाबत दुर्लक्ष होत आहे.
- जिल्ह्यात कोरोनाचे भीतीदायक वातावरण आहे. अशात आम्ही रेशन वितरणाची जबाबदारी सांभाळत आहोत. पॉस मशीनमुळे आमचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ऑफलाईन वितरणाची परवानगी द्यावी, आम्हालाही विमा सुरक्षा देण्यात यावी. अन्यथा परिस्थिती अशीच राहिल्यास १ मेपासून धान्याचे वाटप बंद करू.
गुड्डू अग्रवाल, अध्यक्ष, रेशन दुकानदार संघ