नरखेड: तालुक्यात १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरिता निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. १७ ग्रामपंचायतीच्या ५५ प्रभागातून १४७ सदस्यांची मतदार निवड करणार आहे. १४७ पैकी १४ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून १३३ जागेकरिता मतदार करणार आहेत. ५५ प्रभागांपैकी अंबाडा सायवाडा ग्रामपंचायत प्रभाग क्र २ मधील तिन्ही उमेदवार अविरोध निवडून आले. त्यामुळे ५४ प्रभागाकरिता मतदान होईल. १४ हजार ११८ पुरुष व १२ हजार ७८४ महिला असे एकूण २६,९०२ मतदार ५४ मतदान केंद्रावर मतदान करतील.
प्रशासन सज्ज
निवडणुकीकरिता तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार डी. जी. जाधव यांच्यासह नायब तहसीलदार विजय डांगोरे, भागवत पाटील यांनी पाच निवडणूक अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी, चार झोनल अधिकारी यांच्यासह २६० कर्मचाऱ्यांच्या ६५ पार्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. गुरुवारी सकाळपासून त्यांना मतदान साहित्य वाटप करून मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले.
मतदारांची होणार आरोग्य तपासणी
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्र ग्रामपंचायत कडून सोडिअम हैड्रोक्लोराईड फवारून निर्जंतुक करण्यात आले. जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे पथक प्रत्येक केंद्रावर तैनात करण्यात येणार आहे. केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक मतदाराचे तापमान थर्मामीटर गनद्वारे घेण्यात येईल. तसेच ऑक्सिमिटरने प्रत्येकाची ऑक्सिजन लेव्हल तपासली जाईल. तसेच आकस्मिक गरज भासल्यास प्राथमिक उपचाराची व्यवस्थाही आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे.