भिवापूर : पावसाळ्यासोबतच आता विविध धार्मिक सण आणि उत्सवाचे दिवसही सुरू झाले आहे. अशात यदाकदाचित शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा झाल्यास त्यावर वेळीच नियंत्रण कसे मिळवायचे याबाबत पोलिसांनी शुक्रवारी मॉक ड्रील केली. यावेळी चित्तथरारक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून एकप्रकराची रंगीत तालीम करण्यात आली. सण उत्सवाच्या काळात अनेकदा जमावाची परिस्थिती उद्भवते परिणामी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनाही मग बळाचा वापर करावा लागतो. मात्र कुठल्या परिस्थितीत कशा प्रकारची पावले उचलायची याबाबत ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या उपस्थितीत सहायक निरीक्षक शरद भस्मे व पोलीस यांनी पोलीस स्टेशन मध्ये मॉक ड्रील केली. यावेळी पोलीस कर्मचारी सुरक्षा ढाल, लाठी, बंदूकांसह तैनात होते. सहायक निरीक्षक शरद भस्मे पोलिसांना जमाव शांत करण्याबाबत ध्वनिक्षेपणातून सर्वप्रथम आवाहन करतात. त्यानंतर ठाणेदार महेश भोरटेकर यांना कळवून सर्वप्रथम जमावावर पाण्याचा मारा केला जातो. मात्र जमाव शांत होत नसल्यामुळे पुढे गॅसचा वापर करतात. त्यानंतर लाठीचार्ज आणि शेवटी प्लास्टिक बुलेटची फायरिंग करतात. या दरम्यान जमावातील एक जण जखमी होतो. लागलीच त्याला स्ट्रेचर वरून दवाखान्यात हलविण्यात येते. अशा पध्दतीच्या प्रात्यक्षिकांची तालीम पोलिसांनी आज केली. यात ठाणेदार महेश भोरटेकर, सहायक निरीक्षक शरद भस्मे यांच्यासह वीस पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
बकरी ईद घरीच साजरी करा
कोरोना संसर्गजन्य परिस्थिती व संभावित तिसरी लाट लक्षात घेता सण व उत्सवांना सामूहिक रूप न देता घरगुती पध्दतीने साजरे करा, असे आवाहन करत ठाणेदार महेश भोरटेकर यांनी बकरी ईद निमित्त मुस्लीम बांधवांची बैठक घेतली. संसर्गजन्य परिस्थिती लक्षात घेता, समाजबांधवानी बकरी ईद घरीच साजरी करावी, असे आवाहन केले. यावेळी नियाज शेख, छोटू शेख, मोहसीन कुरैशी, सोएब कुरैशी, तौफिक पटेल आदी उपस्थित होते.
170721\img_20210717_120648.jpg
जमावातील जखमीला स्ट्रेचरवरून हलवितांना मॉब ड्रीलचे हे दृष्य