आरोपींकडून थरारक प्रात्यक्षिकनरेश डोंगरे - नागपूर उपराजधानीला हादरवून सोडणाऱ्या युग मुकेश चांडक हत्याकांडाचा पोलिसांनी ‘डिस्कव्हरी’ पंचनामा करवून घेतला. तब्बल तीन-साडेतीन तास चाललेल्या या सचित्र पंचनाम्यातून आरोपींनी या प्रकरणाचे थरारक प्रात्यक्षिक दाखविले. गुन्ह्याचा कट कसा रचला अन् युगचे अपहरण तसेच हत्या कशी केली, त्याचीही माहिती पोलिसांना दिली. संवेदनशील आणि बहुचर्चित प्रकरणात आरोपींनी दिलेला कबुलीजबाब तंतोतंत आहे की नाही, ते तपासण्यासाठी पोलीस मेमोरंडम (डिस्कव्हरी) पंचनामा करवून घेतात. संबंधित गुन्हा करताना आरोपीने गुन्ह्याची कशी सुरुवात केली अन् तो कसा पूर्ण केला, त्याची इत्थंभूत माहिती प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून पोलीस मिळवतात. काय आहे डिस्कव्हरी? कट रचल्यानंतर त्याची कुणाकुणाला माहिती दिली, कट रचल्यानंतर गुन्हा करण्यासाठी काय काय, कुणाकुणाकडून मिळवले, विकत घेतले, कशाकशाचा वापर केला, कोणत्या ठिकाणाहून गुन्ह्याची सुरुवात केली. घटनास्थळी कसे आले, पहिल्यांदा काय केले, ते केल्यानंतर तेथे काय सोडले किंवा तेथून काय घेतले, गुन्ह्याच्या शेवटी काय आणि कसे केले. गुन्हा करताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुणाकुणाची मदत घेतली, कुणाकुणाशी कशासाठी संपर्क केला, त्याचीही पोलीस माहिती घेतात. प्रत्येक घडामोडीचे पंचाच्या (साक्षीदारांच्या) उपस्थितीत छायाचित्रण (शूटिंग) केले जाते. पोलिसांच्या भाषेत त्याला ‘डिस्कव्हरी किंवा मेमोरंडम’ पंचनामा म्हणतात. हे करण्यासाठी पोलीस छायाचित्रकार/व्हिडिओग्राफरपासून पंचापर्यंतच्या प्रत्येकाला पूर्वसूचना देतात आणि प्रत्येक बाबींची नोंदही करतात.
पोलिसांनी केला ‘डिस्कव्हरी’ पंचनामा
By admin | Updated: September 10, 2014 00:51 IST