जीव वाचल्याने कटकारस्थान उघड : हिंगणा पोलिसांनी आरोपीला केली अटक
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर(वानाडाेंगरी) : अल्पवयीन प्रेयसीवर वर्षभरापासून अत्याचार करणाऱ्या एका आरोपीने लग्नाचा तगादा लावताच तिला विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला. युवती शुद्धीवर आल्यामुळे या धक्कादायक घटनेचा खुलासा झाला. त्यानंतर साैरभ शंकर कोठाळे (वय २२) नामक आरोपीला हिंगणा पोलिसांनी अटक केली.
आरोपी सौरभ हा पेंढरी (ता. हिंगणा) येथील रहिवासी आहे. पेंढरीच्या बाजूलाच सावळी (बिबी) हे गाव आहे. तेथील एका युवतीसोबत (वय १७) साैरभची वर्षभरापूर्वी ओळख झाली. तिच्यावर प्रेमजाळे फेकून आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखविले आणि तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करू लागला. जानेवारी २०२० पासून हा प्रकार सुरू हाेता. वर्षभरात साैरभने अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित केल्याने आणि अलीकडे तो टाळू लागल्याने काही दिवसांपूर्वीपासून युवतीने साैरभकडे लग्न करण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे साैरभने तिच्यापासून कायमची सुटका करून घेण्यासाठी भलतेच कारस्थान रचले.
साेमवारी (दि. ११) तिला लाडीगोडीने खाद्यपदार्थातून विष खाऊ घातले. तिची प्रकृती खालावल्यानंतर आरोपी पळून गेला. पीडित युवतीला कुटुंबीयांनी रुग्णालयात भरती केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने ती शुद्धीवर आली. त्यानंतर पोलिसांना बयाण देताना तिने प्रेमाच्या नावाखाली कटकारस्थान करून जीवावर उठलेल्या प्रियकराची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून हिंगणा पाेलिसांना बुधवारी साैरभविरुद्ध भादंविच्या ३७६ (२) (जे) (एन) ३०७ व पाेक्साे ॲक्ट अन्वये गुन्हा नाेंदवून अटक केली.
अन् डाव उलटला
वर्षभरापासून प्रेयसीपासून शरीरसुख मिळवणारा आरोपी साैरभ तिच्यापासून सुटका करू पाहत होता. मात्र, युवती त्याच्या प्रेमात पुरती गुंतली होती. ती सहजरीत्या पिच्छा सोडणार नाही, हे ध्यानात आल्याने आरोपीने तिच्या हत्येचा कट रचून तिच्यावर विषप्रयोग केला. तिचा मृत्यू झाल्यास तिने आत्महत्या केली, असा अंदाज काढून प्रकरण संपेल आणि कुणाला काही संशयही येणार नाही, असा आरोपीचा अंदाज होता. मात्र, युवती शुद्धीवर आल्याने त्याचा डाव त्याच्यावर उलटला अन् त्याला पोलिसांच्या कोठडीत पोहचावे लागले.