नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : केंद्र सरकाच्या महत्वाकांक्षी 'अमृत भारत स्टेशन योजने' अंतर्गत तयार करण्यात आलेल्या १०३ रेल्वे स्थानकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ मे रोजी करणार आहेत. हा कार्यक्रम ऑनलाईन होणार आहे.
या योजनेअंतर्गत देशभरातील १३०९ रेल्वे स्थानकांना अत्याधुनिक सोयी-सुविधांनी परिपूर्ण करण्याची योजना आखण्यात आली होती. फेब्रुवारी २०२३ मध्ये या प्रकल्पाला सुरूवात झाली होती. रेल्वे स्थानकांच्या आधुनिकिकरणासोबतच प्रवाशी सुविधांचा विस्तार या योजनेत ठेवण्यात आला होता. गेल्या १६ महिन्यात देशातील १०३ रेल्वे स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा २२ मे रोजी पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे. यात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील, महाराष्ट्रातील नागपूरचे नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी, चांदा फोर्ट आणि आमगाव या स्थानकांचा समावेश आहे. मध्य प्रदेशातील शिवनी तसेच छत्तीसगडमधील डोंगरगड स्थानकाचाही यात समावेश आहे.
दपूम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक दीपक गुप्ता यांच्या माहितीनुसार, नागपूर विभागातील १५ स्थानकांना या प्रकल्पात समाविष्ट करण्यात आले होते. त्यातील पाच स्थानकांचे काम पूर्ण झाल्याने त्याचे लोकार्पण पंतप्रधान मोदी करतील. उर्वरित १० स्थानकांचे काम प्रगतीपथावर आहे.
अशा मिळतील सुविधा
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत प्रवाशांना स्वच्छ वेटींग येरिया, रेस्टॉरेंट, खानपानाचे स्टॉल्स, पुरेशी पार्किंग आणि प्रशस्त रस्ते आदी सुविधा मिळतील. या शिवाय उपरोक्त रेल्वे स्थानकांना बस, टॅक्सी तसेच ऑटो रिक्षा स्टॅण्डशी जोडले जाणार आहे. येथे सोलरच्या माध्यमातून प्रकाशव्यवस्था करण्यात आली असून रेन वॉटर हार्वेस्टींग आणि हिरवळीवर भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दपूम प्रमाणेच मध्य रेल्वेच्याही १५ स्थानकांचा पुवर्विकास केला जात आहे.