तिघांविरुद्ध गुन्हा दाखल : नासुप्रच्या अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के आणि स्वाक्षऱ्या नागपूर : सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के आणि स्वाक्षऱ्या मारून एका त्रिकुटाने तब्बल ५२ लोकांना भूखंड विकले. या त्रिकुटाने अशा प्रकारे भूखंड घेणाऱ्यांंसोबतच शासकीय यंत्रणेचीही फसवणूक केल्याचे उघडकीस आल्यानंतर इमामवाडा पोलिसांनी आरोपी उमाकांत विठ्ठलराव मेघे, नरेंद्र हेमंत पाटील आणि हर्षल प्रभाकर चिखले या तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत.हनुमाननगरातील क्रीडा चौक पोस्ट आॅफिसजवळ आरोपींचे घरकुल इन्फोटेक डेव्हलपर्स नावाने कार्यालय आहे. तेथून आरोपींनी कळमना तसेच आजूबाजूच्या परिसरात अकृषक जमिनीवरील (खसरा क्रमांक ११६, पहनं ३६) भूखंड विकण्याचा सपाटा लावला. नोव्हेंबर २००९ ते जून २०१३ पर्यंत आरोपींनी तब्बल ५२ जणांना वेगवेगळ्या क्षेत्रफळाचे भूखंड विकले. प्राथमिक चौकशीनुसार, त्यापोटी आरोपींनी भूखंड घेणाऱ्यांकडून १ कोटी ३ लाख ३५ हजार ८०० रुपये घेतले.भूखंडाची कागदपत्रे पाहू इच्छिणारांना आरोपी बनावट कागदपत्रे दाखवत होते. त्यासाठी त्यांनी नासुप्रचे संबंधित अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या आणि शिक्के मारून कागदपत्रे तयार केली होती. प्रदीर्घ चौकशीनंतर कारवाईनागपूर : कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करून या जमिनीवर अकृषक आणि निवासी वापराची परवानगी मिळवली होती. ही कागदपत्रे आरोपी सर्वांना दाखवत होते. शासकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आणि शिक्के दिसत असल्यामुळे भूखंड घेणारे फसत होते. नटराज टॉकीजजवळ राहणारे अंनत मनोहर राहाटे (वय ४०) यांनीही तीन लाख रुपये देऊन आरोपींकडून भूखंड विकत घेतला होता. दरम्यान, उपरोक्त आरोपींनी या जमिनीची दाखवलेली कागदपत्रे बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर राहाटे यांनी इमामवाडा ठाण्यात तक्रार नोंदवली. प्रदीर्घ चौकशीनंतर पोलिसांनी तसा गुन्हा दाखल केला.(प्रतिनिधी)
बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंड विकले
By admin | Updated: June 17, 2016 03:08 IST