लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रॉपर्टी डीलर आणि त्याच्या साथीदारांनी झारखंडमधील एका व्यक्तीच्या मालकीचा भूखंड ३८ लाखांत परस्पर विकून टाकला. महिनाभरापूर्वी ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर मूळ मालकाने दिलेल्या तक्रारीची शहानिशा करून बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.आनंदकुमार महेंद्रकुमार झा (वय ६१) हे हरीनव कॉलनी नवगड, (जि. धनबाद, झारखंड) येथील मूळ निवासी आहेत. ते सध्या यशोधरानगर, पिवळीनदी परिसरात राहतात. त्यांनी काही वर्षांपूर्वी बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजा सोमलवाडा परिसरात एक १५०० चौरस फुटांचा भूखंड विकत घेऊन ठेवला होता. प्रॉपर्टी डीलर उमेश यादव याला त्याची माहिती होती. ते नागपुरात राहत नसल्याची संधी साधून आरोपी यादव तसेच त्याच्या साथीदारांनी आनंदकुमार झा यांच्या नावाचे पॅन कार्ड, आधार कार्ड, विजेचे बिल तयार केले. या कागदपत्रांवर एका व्यक्तीचा फोटो लावून त्याला आनंदकुमार झा नावाने निबंधक कार्यालयात उभे करून झा यांच्या मालकीचा भूखंड भूषण किशोर मुळे यांना विकला. त्यापोटी त्यांच्याकडून ३८ लाख रुपये घेतले. १२ सप्टेंबर २०१७ ते ६ मे २०१९ दरम्यान हा गैरव्यवहार आरोपींनी केला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भूखंडमालक झा नागपुरात आले. त्यांनी आपल्या भूखंडावर जाऊन पाहणी केली तेव्हा त्यांना तेथे मुळे यांचा कब्जा असल्याचे लक्षात आले. मुळे यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी हा भूखंड विकत घेतल्याची कागदपत्रे दाखवली. विक्रीपत्रावर आनंदकुमार महेंद्र झा नावाने भलताच व्यक्ती उभा झाला आणि त्याने आरोपी उमेश यादव तसेच अन्य साथीदारांच्या मदतीने हे विक्रीपत्र करून दिल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे झा यांनी बेलतरोडी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
नागपुरात बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंडाची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 20:30 IST
प्रॉपर्टी डीलर आणि त्याच्या साथीदारांनी झारखंडमधील एका व्यक्तीच्या मालकीचा भूखंड ३८ लाखांत परस्पर विकून टाकला. महिनाभरापूर्वी ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर मूळ मालकाने दिलेल्या तक्रारीची शहानिशा करून बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
नागपुरात बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंडाची विक्री
ठळक मुद्देझारखंडच्या व्यक्तीची ३८ लाखांनी फसवणूक : बेलतरोडीत गुन्हा दाखल