Maharashtra Election 2019; निवडणूक प्रचारालाही प्लास्टिकबंदीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 11:42 AM2019-10-18T11:42:06+5:302019-10-18T11:44:04+5:30

प्लास्टिकबंदीचा फटका यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रचार साहित्य व्यावसायिकांना बसला असून, कोट्यवधींचा व्यवसाय ठप्प झाला आहे.

Plastic ban effects on election campaign too | Maharashtra Election 2019; निवडणूक प्रचारालाही प्लास्टिकबंदीचा फटका

Maharashtra Election 2019; निवडणूक प्रचारालाही प्लास्टिकबंदीचा फटका

googlenewsNext
ठळक मुद्देनिवडणुकीत दिसताहेत कागदी बिल्ले कागदी साहित्य महाग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून घोषणा केल्यानंतर केंद्र सरकारने २ ऑक्टोबरपासून संपूर्ण देशात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी आणली आहे. त्याचा फटका यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रचार साहित्य व्यावसायिकांना बसला असून, कोट्यवधींचा व्यवसाय ठप्प झाला आहे.
ठोक विक्रेत्यांनी सांगितले की, विदर्भात प्लास्टिक प्रचार साहित्यांची जवळपास १५०० कोटींची उलाढाल आहे. केंद्र सरकारने भारत सिंगल यूज प्लास्टिकमुक्त करण्याच्या दिशेने निर्णय घेतल्याचा परिणाम उलाढालीवर झाला आहे. राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत प्लास्टिकचे प्रचार साहित्य हद्दपार झाले असून, त्याऐवजी कागदी आणि कापडी प्रचार साहित्य बाजारात आले आहेत. विक्रेते म्हणाले, कोणत्याही निवडणुकीसाठी प्रचार साहित्यांची जुळवाजुळव सहा महिन्यांपूर्वीपासून करावी लागते. उमेदवारांनी खरेदी न केल्यामुळे व्यावसायिकांजवळ प्लास्टिकचे प्रचार साहित्य पडून आहेत. निवडणूक आयोगानेही या साहित्यावर बंदी टाकली आहे. आयोगाने तसे पत्र प्रचार साहित्य तयार करणाऱ्यांना आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या सर्वच पक्षांना पाठविले आहे. त्याचा फटका व्यावसायिकांना बसला आहे.
सध्या उत्पादकांकडे आणि बाजारात कागदी बिल्ले उपलब्ध आहेत. शिवाय उमेदवारांचे फोटो लावलेले कागदी पोस्टर्स तयार करून मिळत आहेत. बाजारात कुठेच प्लास्टिकचे प्रचार साहित्य उपलब्ध नाही. विधानसभा निवडणुकीचे मतदान २१ तारखेला होणार आहे. सर्वच पक्षांच्या प्रचाराची लगबग सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचला आहे. अजूनही प्रचार साहित्य व्यावसायिकांमध्ये त्याची पूर्तता करण्यासाठी धडपड सुरू आहे.
नागपुरात विविध पक्षांचे प्रचार साहित्य मुंबई आणि दिल्लीहून येते. नागपुरात प्रचार साहित्यांची विक्री करणारे ५० पेक्षा जास्त ठोक आणि चिल्लर व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे अनेकांनी प्रचार साहित्यांची पूर्वनोंदणी करून आगाऊ रक्कम दिली आहे.
पर्याय म्हणून आता उत्पादक पुन्हा कागदी प्रचार साहित्यांकडे वळले आहेत. विशेष म्हणजे खिशाला लावण्यात येणाऱ्या प्लास्टिक बिल्ल्यांऐवजी इतिहासात जमा झालेले कागदी बिल्ले आता परत निवडणुकांमध्ये दिसत आहेत.

Web Title: Plastic ban effects on election campaign too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.