नागपूर : जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच थंडी कमी झाली असली तरी पहाटे पडणारी गुलाबी थंडी मात्र नागपूरकरांना सुखावत आहे. या गुलाबी थंडीचा सुखद आनंद मंगळवारी सकाळी शहरवासीयांनी घेतला.
गेल्या आठवडाभरापासून थंडी कमी झाली आहे. दोन दिवसांच्या तुलनेत शनिवारी रात्री काही प्रमाणावर थंडी जाणवली असली तरी त्यात जोम नव्हता. येत्या आठवडाभरात थंडी पुन्हा परतण्याची शक्यता असल्याचे तीन दिवसांपूर्वी हवामान विभागाने वर्तविले होते, मात्र सध्यातरी वातावरणामध्ये तसा बदल जाणवला नाही.
मागील २४ तासांमध्ये नागपुरातील किमान तापमान १८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. मागील १२ तासात त्यात ०.५ अंशाची वाढ झाली आहे. दिवसभर आकाश निरभ्र होते. सायंकाळीही वातावरण चांगले होते. तरीही थंडी म्हणावी तशी जाणवली नाही. शहरातील दृश्यता सकाळी १.०२ किलोमीटर नोंदविली गेली. ही विदर्भात सर्वात कमी होती. त्यापाठोपाठ वर्धामध्ये २.०४ दृष्यता नोंदविण्यात आली.
नागपूरकरांनी मंगळवारी सकाळी गुलाबी थंडीचा आनंद घेतला. संथ गार वाऱ्यामुळे वातावरण आल्हादायक झाले होते. सकाळी ९ वाजतानंतर मात्र वातावरणातील थंडावा पळाला. शहरात सकाळी आर्द्रता ८१ टक्के नोंदविण्यात आली. सायंकाळी मात्र ही टक्केवारी ६६ होती. गडचिरोली शहरात मंगळवारी सकाळची आर्द्रता विदर्भात सर्वाधिक म्हणजे ८८.४६ नोंदविण्यात आली. मात्र सायंकाळी ही टक्केवारी ४६ पर्यंत खालावली होती.
...
विदर्भातील हवामान
गेल्या २४ तासात विदर्भात यवतमाळातील किमान तापमान सर्वात कमी म्हणजे १६.० अंश सेल्सिअस होते, गोंदियाचे १६.५, तर वाशिमचे तापमान १६.६ अंश नोंदविले गेले. बुलढाणा आणि नागपुरातील किमान तापमान १८.० अंशावर होते. अकोला आणि चंद्रपुरातील तापमान १७.६ अंश, तर अमरावतीचे १९.७ अंश होते. गडचिरोलीतील तापमानाची १८.४ अंश सेल्सिअस अशी नोंद झाली.
...