नागपूर : एरवी शासकीय दरबारी एखाद्या योजनेतून मदत मिळविण्यासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र एखाद्या हेविवेट मंत्र्याचा फोन गेल्यावर यंत्रणा कामी लागते व जनतेला लगेच दिलासा मिळतो. असाच अनुभव बुलडाणा जिल्ह्यातील मतिमंद निवासी विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना आला. मागील अनेक दिवसांपासून केंद्र शासनाच्या योजनेतून मदतीसाठी ते प्रयत्न करत होते. मात्र ते काम रखडले होते. आपली कैफियत घेऊन ते रविवारी नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात पोहोचले. गडकरींनी त्यांची समस्या ऐकून घेत थेट बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांना फोनच लावला. काही मिनीटांतच केंद्र सरकारच्या ॲडीप योजनेतून दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत करण्याबाबत करण्याची सूचना केली. गडकरी यांच्या एका फोनमुळे या विद्यार्थ्यांच्या शासकीय मदतीचे मार्ग मोकळा झाला.
रविवारी गडकरी यांच्या खामला मार्ग येथील जनसंपर्क कार्यालयात मोठ्या प्रमाणावर नागरिक त्यांच्या समस्या घेऊन पोहोचले होते. त्यात हे दिव्यांग विद्यार्थीदेखील होती. याशिवाय इतर नागरिकांनी वैयक्तिक तसेच प्रशासकीय अडचणी गडकरी यांच्यासमोर मांडल्या.
अयोध्यानगर परिसरातील नागरिकांनी नाल्याचे पाणी वस्तीत शिरत असल्याचे निवेदन दिले. गडकरी यांनी थेट मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांना फोन करत तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले. यासोबतच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील तरुणीने गडकरी यांना नोकरीच्या संदर्भात निवेदन दिले. तिला पात्रतेनुसार नोकरी देण्याबाबत निर्देश त्यांनी दिले. यासोबत गडकरी यांच्यासमोर नागरिकांनी रेल्वे, महामार्ग, कृषी, सहकार, पर्यावरण, पाणीपुरवठा, ऑटोमोबाईल अशा विविध विभागांशी संबंधित समस्या मांडल्या. काही नागरिकांनी मागील जनसंपर्क कार्यक्रमात दिलेल्या निवेदनांवर शासकीय पावले उचलल्या गेली असल्याची माहिती गडकरी यांना भेटून दिली.