२४ वर्षीय काजल एनएडीटी परिसरातील महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्रात काम करते. १७ मे रोजी दुपारी एका युवकाने काऊंटरची चावी हिसकण्याचा प्रयत्न करीत काजलवर हल्ला केला होता. दगडाने तिचे डोके फोडले होते. काजलने आरडाओरड केली तेव्हा काही लोक पोहोचले. लोकांना पाहून आरोपी फरार झाला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे पोलीसही हादरले होते. सीसीटीव्ही आणि इतर माहितीच्या आधारावर पोलिसांनी अयाजला ताब्यात घेतले. त्याने आपला गुन्हा कबूल केला. अयाज हा गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल आहे.
-----------
शेजाऱ्याने केला बलात्कार
नागपूर : विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या शेजाऱ्याविरुद्ध जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संगम गजभिये (२६) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या शेजारी ३० वर्षीय विवाहिता राहते. तिचा पती दारुडा आहे. पाच वर्षांपासून तिची आरोपीसोबत ओळख आहे. त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. महिलेच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे
---------------
कंत्राट देण्याच्या नावावर फसवणूक
नागपूर : मीटर लावण्याचे कंत्राट देण्याचे आमिष दाखवून दोन लाखांची फसवणूक करण्यात आली. काशीनाथ कोकाटे रा. हनुमाननगर यांची २०१९ मध्ये महेश्वर रघुनाथ पतंगे (३५) रा. बीड, भरतभाई लक्ष्मणभाई रोखडिया (४८) आणि हिमांशू सडालिया (३५) रा. सूरत यांची पुण्यात एका मीटिंग दरम्यान भेट झाली होती. तिघांनीही कोकाटे यांना ५०० ते एक हजार मीटर लावण्याचे कंत्राट देण्याचे आमिष दिले. या मोबदल्यात २ लाख रुपये घेतले. कोकाटेने ही रक्कम अजनी येेथील भरतभाई रोखडिया यांच्या बँक खात्यात जमा केली. यानंतरही मीटर लावण्याचे कंत्राट न मिळाल्याने कोकाटे यांनी आपले पैसे परत मागितले. परंतु आरोपी टाळाटाळ करू लागले. त्यामुळे कोकाटे यांनी अजनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.